उत्तर प्रदेशमधील रायबरेली सदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अदिती सिंह या मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. पक्षाची विचारसरणी आणि पक्षविरोधी वक्तव्यांमुळे ३२ वर्षीय युवा आमदार असणाऱ्या अदिती सिंह यांच्याविरोधात उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधानसभा अध्यक्षांकडे अदिती यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे असा अर्ज केला आहे. तर दुसरीकडे अदिती स्वत: काँग्रेसपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ट्विटर हॅण्डलमध्ये बदल करुन काँग्रेचा उल्लेख काढून टाकला. आता अदिती यांनी काँग्रेसशी संबंधित व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपही सोडले असल्याचे वृत्त समोर येत आहे.

अदिती यांनी ट्विटवरील आपल्या हॅण्डलचे नाव बदलून त्यामध्ये असणारा काँग्रेसचा उल्लेख काढून टाकला आहे. सध्या त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलचं नाव @AditiSinghRBL असं ठेवलं आहे. नावातील आरबीएलवरुन त्यांना रायबरेली असं सुचित करायचं आहे. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये अदिती यांच्यासंदर्भातील चर्चांना पुन्हा उधाण आलं. “सध्या जगभरामध्ये करोनाविरुद्धची लढाई सुरु आहे. या कालावधीमध्ये माझं सर्वांना आवाहन आहे की श्रमिक मजुरांना जमेल तितकी मदत करा. माझ्या खासगी ट्विटर हॅण्डलमध्ये काय झालं आहे यापेक्षा मजूरांची मदत करणे हा अधिक महत्वाचा विषय आहे,” असं अदिती सिंह यांनी न्यूज १८ या हिंदी वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं होतं.

सरचिटणीस पदावरुन निलंबन

काही दिवसांपूर्वीच काँग्रेसने शिस्तभंग केल्या प्रकरणी अदिती यांना पक्षाच्या महिला शाखेच्या सरचिटणीस पदावरून निलंबित केलं आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोलावलेल्या विधानसभेच्या विशेष सत्राला उपस्थित लावणाऱ्या अदिती यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी पक्षाने यापूर्वीच केली आहे. आता अदिती यांनी काँग्रेसशी संबंधित सर्व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप सोडले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

प्रियांका आणि राहुल गांधींवर टीका

मागील काही आठवड्यांपासून स्थलांतरित कामगारांसाठी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यावरून काँग्रेस आणि भाजपात उत्तर प्रदेशात राजकारण सुरू आहे. या राजकारणावरून अदिती यांनी आपल्या पक्षालाच धारेवर धरलं होतं. त्यांनी थेट प्रियांका गांधी यांच्यावरच टीका केली होती. “संकटाच्या या काळात खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करण्याची गरजच काय? ज्या एक हजार बसेसची यादी पाठवण्यात आली त्यातील अर्ध्याहून अधिक बसेसची नोंदणीच बनावट आहे. २९७ बसेस भंगार आहेत. ९८ ऑटो रिक्षा आणि अ‍ॅम्ब्युलन्ससारख्या गाड्या आहेत. ६८ गाड्या अशा आहेत, ज्यांना कोणतेही परवान्याचे कागदपत्रच नाहीत. ही क्रूर थट्टा आहे. बस होत्या तर त्या राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्रातही का नाही सुरू केल्या?,” असं ट्विट अदिती यांनी २० मे रोजी केलं होतं.

मुख्यमंत्री योगी यांची केली प्रशंसा

कोटामध्ये जेव्हा यूपीचे हजारो विद्यार्थी अडकले होते तेव्हा या हजार बसेस कुठे होत्या. काँग्रेस सरकार या विद्यार्थ्यांना घरापर्यंतच काय सीमेवरही सोडू शकलं नाही. उलट योगी आदित्यनाथ यांनी रात्रीतून या विद्यार्थ्यांना घरी पोहोचवलं. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनीही यासाठी कौतुक केलं होतं, अशा शब्दांत आदिती सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा केली.