बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली व गुजरातमध्ये बिहारी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त केली. नितीश कुमारांनी चौदा महिन्यांच्या मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा निषेध केला. जो दोषी आहे त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण एक व्यक्तिच्या गुन्ह्यासाठी तुम्ही सर्वांना शिक्षा देऊ नका असे नितीश कुमार म्हणाले.

आमचे सरकार जागरुक आणि सर्तक आहे. मी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांबरोबर याविषयावर बोललो आहे. आमचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक गुजरातमधल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत असे त्यांनी सांगितले.
कोणी गुन्हा केला असेल तर त्याला कठोर शासन झालेच पाहिजे पण एका घटनेच्या आधारावर तुम्ही संपूर्ण समाजाला लक्ष्य करु नका असे नितीश कुमार म्हणाले.

गुजरातमध्ये बिहारी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांसाठी जनता दल युनायटेडचे आमदार आणि प्रवक्ते नीरज कुमार यांनी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लिहिलेल्या दोन पानी खुल्या पत्रात काँग्रेस पक्षाला हिंसाचारासाठी जबाबदार धरले आहे. काँग्रेसने गुजरातचा आमदार अल्पेश ठाकोरला राष्ट्रीय सरचिटणीस बनवून बिहारची जबाबदारी सोपवली आहे. त्याची गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना बिहारी नागरिकांवर राज्याबाहेर काढत आहे असा आरोप नीरज कुमार यांनी केला आहे.

गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराची घटना समोर आल्यापासून येथे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात संतापाची लाट उसळली आहे. रविवारीही दोन ठिकाणी हल्ले झाले. गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे हल्ला होण्याचे आतापर्यंत एकूण 42 गुन्हे दाखल झाले असून 342 जणांना अटक करण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हिंसेच्या भीतीने परराज्यांतून विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे.

बुधवारपासून गुजरातच्या गांधीनगर, मेहसाणा, पाटन, साबरकाठा ते अगदी अहमदाबाद या ५ जिल्ह्यांमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनांनी पेट घेतला आहे. त्यामुळे बिघडलेल्या परिस्थितीमुळे गुजरातमधील अनेक उत्तर प्रदेश आणि बिहारच्या कामगारांनी पळ काढला आहे. मेहसाणा आणि साबरकाठा या जिल्ह्यांमध्ये परिणाम सर्वाधिक जाणवत आहे, तर अहमदाबाद येथून आतापर्यंत 73 आणि गांधीनगर येथून 27 जणांना अटक करण्यात आली आहे.