मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचा जवळपास पूर्ण निकाल हाती आला असला तरी अंतिम निकाल अद्यापही स्पष्ट झालेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार 230 पैकी 114 ठिकाणी काँग्रेस, भाजपा 109 जागांवर तर इतर ७  विजयी झाले आहेत. दरम्यान, येथे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेसने रात्री उशीरा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी आमच्याकडे स्पष्ट बहुमत असल्याचा दावा केला आहे. तसंच, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना एक पत्र पाठवून सत्ता स्थापनेचं आमंत्रण देण्याची मागणी केली आहे. सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांनी आम्हाला बोलवावं, त्यांच्यासमोर आम्ही बहुमत असल्याचं सिद्ध करुन दाखवू असं कमलनाथ म्हणालेत. काही अपक्षांचा पाठिंबा असल्याचाही काँग्रेसचा दावा आहे. तर यापूर्वीच निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचे सर्व निकाल स्पष्ट केले जातील, त्यानंतर वेळ देण्यात येईल, असं राज्यपाल कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.


एखाद्या पालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे प्रत्येक मत महत्त्वाचे असते त्याचा प्रत्यय मध्य प्रदेशात आला. उशिरापर्यंत भाजप व काँग्रेस यांच्यात सत्तेसाठी संघर्ष सुरू होता. काँग्रेसने उशिरा सत्तास्थापनेचा दावा केला आहे.शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारमधील जवळपास डझनभर मंत्र्यांना धक्का बसला. विशेष म्हणजे आदिवासी बहुल जागांवरही भाजपला फटका बसला.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या प्रतिमेवर भाजप अवलंबून होता. चौहान यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अरुण यादव यांना पराभूत केले. या वेळी विरोधी काँग्रेसमधील गटा-तटांचे ऐक्य तसेच शेतकऱ्यांची नाराजी व उमेदवारी वाटपातील घोळ हे मुद्दे भाजपला भोवले. भाजपला अतिआत्मविश्वास नडल्याचे मानले जात आहे. बहुतांश जनमत चाचण्यांनी राज्यात चुरशीची लढत होईल असे भाकीत तंतोतंत खरे ठरले. दोन्ही पक्षांची मते जवळपास सारखीच म्हणजे ४१ टक्क्यांच्या आसपास आहे.

राज्याचे विभागवार विश्लेषण केल्यास चंबळ खोऱ्यात काँग्रेसने एकतर्फी विजय मिळवला. इथे काँग्रेसला २६ तर भाजपला केवळ सहाच जागा जिंकता आल्या. ग्वाल्हेर-चंबळ भागातील या ३४ जागा महत्त्वपूर्ण होत्या. काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी या विभागात जोरदार प्रचार करत भाजपला धक्का दिला. विंध्य विभागातच भाजपला काय ते यश मिळले. इथे भाजपला ३६ तर काँग्रेसला १८ जागा मिळाल्या. इतरांना दोन जागा मिळवता आल्या. आदिवासीबहुल महाकौशल विभागात या वेळी काँग्रसने भाजपला रोखले. काँग्रेसला २४ तर भाजपला २२ जागाजिंकता आल्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व छिंदवाडय़ाचे खासदार कमलनाथ तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह हे दोघेही या भागातील आहेत. या भागात जबलपूरसारख्या बालेकिल्ल्यात भाजपला पराभव झाला. शहरातील चार पैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या सत्ताविरोधी लाटेचा भाजपला हादरा बसला. माळवा नेमाड प्रांतातील ६४ जागांवरही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. भाजपला इथे ३८ तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या. माळवा आदिवासी पट्टय़ात भाजपचा दारुण पराभव झाला. इथे काँग्रेसला १८ तर भाजपला अवघ्या ८ जागा मिळाल्या.