पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारसाठी सामान्य भारतीयांच्या जीवाची काहीच किंमत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने ट्विटरवरुन #NoLivesMatterToBJP हा हॅशटॅग पोस्ट करत अनेक विषयांच्या आधारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. अगदी शहीद जवांनांपासून ते स्थलांतरित मजुरांपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारच्या कुशासनामध्ये अनुसूचित जातीमधील महिलांविरोधातील गुन्हेगारीत वाढ होता आहे. न्याय सध्या मिळत नसून आरोपी सत्तेची सुरक्षा असल्याने भीती शिवाय फिरत आहेत. या सरकारच्या नेतृत्वाखाली मुली असुरक्षित आहेत, असं काँग्रेसने पहिल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटबरोबर शेअर करण्यात आलेल्या फोटोमध्ये, अनुसूचित जातीमधील बहिणींची आपल्याला काहीच किंमत नाही का? असा सवाल या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये एका वर्षभरामत अनुसूचित जातीमधील महिलांवरील बलात्कारांच्या प्रकरणांमध्ये ३७ टक्क्यांनी तर त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे.

अन्य एका ट्विटमध्ये भाजपा सरकारला शहीद सैनिकांच्या जीवाचीही किंमत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. “जेव्हा पुलवामामध्ये आपले जवान शहीद झाले तेव्हा पंतप्रधान डिस्कव्हरीच्या कार्यक्रमाचे चित्रिकरण करण्यात व्यस्त होते. पंतप्रधानांपर्यंत बातमी पोहचल्यानंतरही चित्रिकरण रद्द करण्यात आलं नाही. कारण पंतप्रधानांच्या जाहिरातबाजीसमोर बलिदान केवळ मतांसाठीचे माध्यम आहे,” असं काँग्रेसने म्हटलं आहे. या कॅप्शनसहीत एकीकडे पुलवामामधील शहीद सैनिकांच्या शवपेट्यांचा फोटो तर दुसरीकडे मोदींनी सहभाग घेतलेल्या डिस्कव्हरीमधील कार्यक्रमातील फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

पुढील एका ट्विटमध्ये तुम्ही भाजपासाठी फारसे महत्वाचे नसल्यास तुमची दखलही घेतली जाणार नाही अशा फोटोसहीत काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे. या पोस्टमध्ये एकीकडे स्थलांतरित मजूर तर दुसरीकडे मोदींनी ९ वाजता ९ दिवस मोहिमेअंतर्ग दिवा लावल्याचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. “पंतप्रधानांनी टीव्हीवर येऊन नियोजन न करता लॉकडाउनची घोषणा केल्याने अशाप्रकारे लाखो मजदूर रस्त्यावर उतरुन तडफडत आपल्या राज्यात जाण्यासाठी निघालेले. मात्र संवेदना नसलेले पंतप्रधान दिवे-मेणबत्त्या पेटवण्याचा सल्ला देत होते,” असं काँग्रेसने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

राष्ट्रीय नायक असल्याचे नाटक करुन आपल्या खरा राष्ट्रीय नायकांना म्हणजेच सेनेतील जवानांना विसरणारे आपले पंतप्रधान आहेत असा टोलाही काँग्रेसने लगावला आहे. पंतप्रधानांसाठी मोरांना दाणे टाकणे आणि जाहिरातबाजीचे व्हिडीओ बनवणे हेच राष्ट्रीय नायक बनण्याच्या योग्यतेचे आहेत, असं अन्य एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दिल्लीमधील ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या मुख्यालयामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा आणि दवेंद्र यादव यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करतानाही भाजपावर निशणा साधला. यावेळी खेरा यांनी उत्तर प्रदेश हत्या आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे सांगतानाच गुन्हेगारीसंदर्भातील आकडेवारीच दिली आहे.

आंदोलकांना ऐवजी मोदींचे ट्विटवर आभार प्रदर्शन सुरु आहे अशी टीकाही एका ट्विटमधून काँग्रेसने केली आहे.

#NoLivesMatterToBJP हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डींगमध्ये पाचव्या क्रमांकावर होता.


काही तासांमध्ये नऊ हजारहून अधिक जणांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे.