अयोध्या प्रकरणातील न्यायदानास होणाऱ्या विलंबासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस आणि सुप्रीम कोर्टातील दोन ते तीन न्यायाधीशांना जबाबदार ठरवले आहे. ‘काँग्रेस, डावे पक्ष आणि सुप्रीम कोर्टातील दोन ते तीन न्यायाधीश अयोध्या प्रकरणातील विलंबासाठीचे “गुन्हेगार” आहेत’, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी पुण्यात अयोध्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले, अयोध्येतील रामजन्मभूमी वादातील खटल्यास विलंब होत असून या विलंबासाठी तीन जण गुन्हेगार आहेत. यात काँग्रेस आणि डावे पक्ष अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे. तर सुप्रीम कोर्टातील 2 ते 3 न्यायाधीश हे तिसरे गुन्हेगार आहेत. हे न्यायाधीश सुनावणीस विलंब करत आहेत. सुप्रीम कोर्टाने तीन वर्षांपूर्वीच अयोध्या वादावर दररोज सुनावणी घेणार असल्याचे सांगितले होते, असा दावाही त्यांनी केला.

राम मंदिरासाठी केंद्र सरकारने अध्यादेश आणावा, अशी मागणीही त्यांनी केली. आम्ही या मुद्द्यावर संसदेत चर्चा करावी, असे आवाहन केंद्र सरकारला करतो. या प्रकरणात तातडीने न्याय मिळणे आवश्यक असून देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करुन राजकीय फायदा मिळवत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला आहे. शिवसेना व अन्य हिंदुत्ववादी संघटना राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक आहेत. तर दुसरीकडे अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी अध्यादेश काढला जाणार नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच राममंदिर उभारणीबाबत अध्यादेश काढण्याचा विचार केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षातील पहिल्याच दिवशी दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले होते.