वेगळ्या तेलंगण राज्यासाठी गेली दहा वर्षे आंदोलन करत असलेल्या तेलंगण राष्ट्र समितीचे (टीआरएस) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली. तेलंगण निर्मितीबद्दल आभार मानण्यासाठी ही भेट घेतल्याचे टीआरएसच्या नेत्यांनी सांगितले आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि आता पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतल्यानंतर टीआरएस काँग्रेसमध्ये विलीन केल्या जाण्याच्या शक्यतेला अधिक बळ लाभले आहे.
‘तेलंगण राज्य निर्मितीसाठी पुढाकार घेतल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानणे, हा आजच्या भेटीचा मुख्य हेतू होता,’ अशी माहिती टीआरएसचे नेते व खासदार मंदा जगन्नाथ यांनी सांगितले. भेटीदरम्यान राव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नव्या तेलंगण राज्यासमोरील तातडीच्या समस्यांबाबतही पंतप्रधानांशी चर्चा केली. त्यामध्ये एम्सच्या धर्तीवर नव्या राज्यात संस्था निर्माण करणे, गॅसवाटप आणि हैदराबाद शहराचा जागतिक दर्जा टिकवण्यासाठी केंद्राकडून मदत या मुद्दय़ांचा समावेश होता, असे ते म्हणाले.