इंधनाचे दर वाढल्याने मोदी सरकारवर चौफेर टीका होताना दिसते आहे. अशातच काँग्रेसने जन की बात या आपल्या सदरात एक ट्विट करत मोदी सरकारची पुन्हा एकदा खिल्ली उडवली आहे आणि मोदी सरकार इंधनाचे वाढते दर रोखण्यात सपशेल अपयशी झाल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्यंगचित्र ट्विट केले आहे. ज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल यांना फलंदाज दाखवण्यात आले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी बॉलिंग करताना दाखवण्यात आले आहेत. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना विकेट किपिंग करताना दाखवण्यात आले आहे.

पेट्रोल या फलंदाजाचे ९० रन झाल्याचे दाखवण्यात आले आहे. कारण आजच मुंबईत पेट्रोलचे दर ९० रुपयांवर गेले आहेत. पेट्रोल आता लवकरच शंभर रन करणार म्हणजेच प्रति लिटर दराची शंभरी गाठणार आणि डिझेलही शंभरी गाठणार असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. मोदी बॉलिंग करत असताना डिझेल दाखवण्यात आलेला फलंदाज नो बॉल असे म्हणताना दाखवण्यात आला आहे. तर स्कोअर बोर्डवर ५६ ओव्हर झाल्याचे दाखवण्यात आले आहे आणि टोटल ४२० दाखवण्यात आली आहे. हे व्यंगचित्र भाजपा आणि मोदी भक्तांना चांगलेच झोंबणारे आहे. याआधी राफेल करारावरून मोदी सरकारची खिल्ली उडवल्यानंतर आता वाढत्या इंधन दरांवरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारची खिल्ली उडवली आहे.

सत्ता की पिच पर नौसिखियों की भरमार हो गयी, तेल के बढ़ते दामों पर धराशायी सरकार हो गयी असा संदेशही या व्यंगचित्रासोबत पोस्ट करण्यात आला आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांविरोधात काँग्रेसने देशभरात आंदोलनही केले होते. तरीही हे दर कमी झालेले नाहीत. त्यामुळे आता व्यंगचित्र पोस्ट करून काँग्रेसने मोदी सरकार इंधन दर कमी करण्यात सपशेल हारलं आहे अशी टीका केली आहे.