नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी रोजगार निर्मितीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नोकऱ्या निर्मितीमध्ये फार चांगली नव्हती. पण मोदी सरकारने परिस्थिती खूपच वाईट करुन ठेवली असे मत अमर्त्य सेन यांनी व्यक्त केले. देशातील आर्थिक असमानतेवर आरक्षण उत्तर असू शकत नाही असे अमर्त्य सेन म्हणाले.

आर्थिक संधी निर्माण करुन आपण उत्पन्नातील असमानतेच्या समस्येचा सामना करु शकतो असे सेन म्हणाले. इंडिया टुडेशी बोलताना त्यांनी ही मते व्यक्त केली. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीची काही वर्ष लोकांमध्ये आरक्षणाचा विषय जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले.

आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आरक्षण कायम ठेवणे ही काँग्रेसची चूक होती असे मोदी सरकारला वाटते तर त्यांनी तोच मार्ग अवलंबण्याऐवजी ती चूक सुधारायला हवी होती असे सेन म्हणाले.

असमानतेमुळे आरक्षण आणले गेले तो उत्पन्नाचा विषय नव्हता असे अमर्त्य सेन म्हणाले. उत्पन्नातील असमानतेवर आरक्षण उत्तर असू शकत नाही. हा गोंधळलेला विचार आहे. आपण आर्थिक संधी निर्माण करुन आपण उत्पन्नातील असमानतेच्या समस्येचा सामना करु शकतो असे अमर्त्य सेन यांनी सांगितले. आरक्षणावर लक्ष केंद्रीत करुन चालणार नाही. आज देशाला चांगले शिक्षण, आरोग्य सुविधांची गरज आहे असे त्यांनी सांगितले.