मध्य प्रदेशमधील चित्रकूट विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही यश हाती आल्याचे दिसत नाही. या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार नीलांशू चतुर्वेदी यांनी भाजपचे उमेदवार शंकरदयाल त्रिपाठी यांचा १४,३३३ मतांनी पराभव केला. सुरूवातीपासूनच चतुर्वेदी हे त्रिपाठींपेक्षा आघाडीवर होते.

काँग्रेसचे आमदार प्रेमसिंह यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक झाले. २९ मे रोजी वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. दि. ९ नोव्हेंबर रोजी सुमारे ६५ टक्के इतके मतदान झाले होते. यामध्ये पुरूषांपेक्षा महिलांनी सर्वाधिक मतदान केले होते.

भाजप आणि काँग्रेसने आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीसाठी वापरली होती. निवडणुकीच्या रिंगणात १२ उमेदवार होते. पण मुख्य लढत ही त्रिपाठी आणि चतुर्वेदी यांच्यातच होती. स्वत: मुख्यमंत्री चौहान यांनी तीन दिवस चित्रकूटमध्ये प्रचार केला होता. उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या या मतदारसंघात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनीही प्रचार केला होता.