लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात बिहारमधील पाटणा येथे सबा आणि फराह या २२ वर्षीय सयामी जुळ्या बहिणींनी यंदा मतदानाचा स्वतंत्रपणे हक्क बजावला. या अगोदर त्यांना स्वतंत्र मतदानाची परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र यावेळी निवडणूक आयोगाने त्यांची मागणी मान्य केल्याने दोघीही आनंदी होत्या. त्यांना वेगवेगळे मतदार ओळखपत्रही मिळाले आहे.

निवडणूक आयोगाने मतदार जागृतीच्या अनुषंगाने या दोन्ही बहिणींचे आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फोटो ट्वीट केले आहे. या फोटोंमध्ये दोघीही आपल्या ओळखपत्रांसह मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोटाला लावलेली शाई दाखवतांना दिसत आहेत.

या अगोदर निवडणूक आयोगाने दोन्ही बहिणींना केवळ एकाच मताचा अधिकार दिला होता. शिवाय दोघींनाही एकच ओळख देण्यात आले होते. आयोगाचे असे मत होते की, या दोघी बहिणी शरीराने वेगळ्या असतील मात्र मानसिकदृष्ट्या त्या एकच आहेत. त्यामुळे त्यांना एकच मत देण्याचा अधिकार आहे. मात्र, यंदा पाटणाच्या डीएमच्या पुढाकारामुळे या दोघींना स्वतंत्रपणे मतदानाचा हक्क बजावता आला.