२०१९ची निवडणूक भारताच्या दोन भिन्न अवधारणांमध्ये होती. एक बाजूला प्राचीन अध्यात्मआधारित एकात्म, सर्वागीण आणि सर्वसमावेशक जीवनदृष्टीचे हिंदू चिंतन होते. जिला जगात हिंदूजीवनदृष्टी किंवा हिंदूचिंतन या नावाने ओळखले जाते. दुसरीकडे ती अभारतीय दृष्टी होती, जी भारताला अनेक अस्मितांमध्ये विभाजित करू बघत असते. आणि स्वत:च्या निहित स्वार्थासाठी समाजाला जाती, भाषा, प्रांत तसेच उपासना पंथाच्या नावावर विभागण्याचे काम करत आली आहे. या आणि भेदाचे राजकारण करणाऱ्यांनी नेहमीच समाजाला जोडणाऱ्या, एकात्म दृष्टीने बघणाऱ्या शक्तीला विरोध केला आहे. तसेच त्यासंबंधी वेगवेगळ्या प्रकारचे आधारहीन, खोटे आरोप सतत करून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वातंत्र्यापासून सुरू असलेली ही वैचारिक लढाई आता एका निर्णायक वळणावर येऊन पोहचली आहे. या वर्षीची निवडणूक या लढाईचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. समाज एक होऊ लागताच, भेदभावाचे राजकारण करणाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. म्हणून समाजात भेद निर्माण करणाऱ्या सर्वानी एकत्रित येऊन, परस्परांना सहकार्य करीत, या जोडणाऱ्या शक्तीचा सामना करण्याचा प्रयत्न केला. भारतातील शहाण्या व बुद्धिमान जनतेने सर्वाना जोडणाऱ्या, सर्वसमावेशक भारताचे समर्थन करत, ‘सर्वाचा विकास’ या सूत्राला विजयी केले आहे. आजचा दिवस भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत आश्वासक असा आहे. यासाठी भारताची जनता अभिनंदनास पात्र आहे.

या वैचारिक लढाईत भारताच्या बाजूने असलेल्या मजबूत नेतृत्वाचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे हार्दकि अभिनंदन!

– मनमोहन वैद्य रा. स्व. संघाचे सह सरकार्यवाह