नवी दिल्ली : करोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे नमूद करीत ३७७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली. ७ मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने शिखर गाठले होते, परंतु आता त्यांत ६८ टक्क्यांनी घट झाल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर लसीकरणात प्रौढांना प्राधान्य देण्यात येणार असून लहान मुलांबाबत तातडीने निर्णय होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले. गेल्या २४ तासांत देशात एक लाख ३२ हजार नव्या रुग्णांचे निदान करण्यात आले. तर शुक्रवारी गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी म्हणजे १४ हजार १५२ नवीन बाधितांची नोंद झाली.