कर्नाटकमधील बेंगळूर दक्षिणचे भाजपा खासदार तेजस्वी सूर्या यांनी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी (५ ऑगस्ट २०२० रोजी) तेजस्वी यांनी ट्विटवरुन धर्म टीकवण्यासाठी हिंदूंकडे सत्ता असणे अत्यंत गरजेचे आहे असं ट्विट केलं आहे. अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा सुरु असतानाच तेजस्वी यांनी हे ट्विट केलं आहे.

भाजपाच्या सर्वात तरुण खासदारांपैकी एक असणाऱ्या तेजस्वी यांनी, “प्रिय हिंदू बांधवांनो… सर्वात महत्वाचा धडा हा आहे की राज्यात सत्तेवर नियंत्रण असेल तरच धर्माचा अंकुश कायम राहतो. त्यासाठी सत्ता हाती असणे आवश्यक आहे. जेव्हा आपल्याकडे राज्याचे नियंत्रण नव्हते तेव्हा आपण आपले मंदिर गमावले. जेव्हा आपण (सत्तेत) परत आलो तेव्हा पाण पुन:निर्माण केलं. सन २०१४ मध्ये २८२ आणि २०१९ मध्ये ३०३, पंतप्रधान मोदींमुळे हे शक्य झालं आहे,” असं ट्विट केलं आहे.

तेजस्वी यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना कर्नाटक उच्च न्यायालयामधील माजी सरकारी वकील असणाऱ्या बी. टी. व्यंकटेश यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना व्यंकटेशन यांनी “तेजस्वी यांचे वक्तव्य एका मोठी आणि सुशिक्षित शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्याला शोभणारं नाही. त्यांचे वक्तव्य हे संविधानातील भावनांच्या विरोधातील आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. भाजपा खासदाराचे वक्तव्य भारतीय संविधानामध्ये नमूद करण्यात आलेल्या निर्देशित मुल्य आणि मूलभूत अधिकाऱ्यांचा विरोधात आहे. संसदेचा सदस्य म्हणून त्यांनी जी शपथ घेतली आहे त्याच्याही विरोधात आहे हे, असं व्यंकटेश यांनी नमूद केलं आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. आणि प्रत्येक लोकनियुक्त प्रतिनिधिने संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये एकता आणि एकात्मता कायम राहील यासाठी काम करणं गरजेचे आहे, असंही व्यंकटेश म्हणाले आहेत.