तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची लोकप्रियता नेहमीच चर्चेचा विषय असते. अम्मांसाठी त्यांचे समर्थक काहीही करण्यास तयार असतात. पण तामिळनाडूमध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलने चक्क जयललितांचे स्मारक बांधण्यासाठी नोकरीवर पाणी सोडले आहे. दोन लहान मुल असलेला हा पोलीस हवालदार यापूर्वी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने चर्चेत आला होता.

थेनी जिल्ह्यातील ओडापट्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आर वेलमुरुगन हे जयललिता यांच्या निधनाने व्यथीत झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राशी बोलताना वेलमुरुगन यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. जयललितांविषयी वेलमुरुगन म्हणतात, मी धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. जयललिता आजारी असल्याचे वृत्त समजताच मी देवीच्या दर्शनाला गेलो. पण देवाने माझी प्रार्थना ऐकली नाही. मी चेन्नईत आलो आणि माझ्या आईचे निधन झाले निधन झाले हे सांगताना ते काहीसे भावूक झाले होते.

वेलमुरुगन यांचे वडील रमैय्या हेदेखील तत्कालीन मुख्यमंत्री एमजीआर यांच्या निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. वडीलांनंतर वेलमुरुगनही पोलीस खात्यात भरती झाले. १९९९ ते २००२ या कालावधीत ते जयललिता यांच्या घरी सुरक्षारक्षक म्हणून तैनात होते. जयललिता यांच्या घरी तैनात झाल्याचे वृत्त समजताच माझ्या आनंदाला सीमा नव्हती. माझे स्वप्न पूर्ण झाले होते. जयललिता यांच्या चेह-यावरील स्मितहास्य बघण्यासाठी मी दिवसभर प्रतीक्षा करायचो अशी आठवण त्यांनी सांगितले.

जयललिता यांच्या निधनानंतर वेलमुरुगन यांनी आता पोलीस खात्यातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. थेनीतील पोलीस अधीक्षकांना त्यांनी राजीनामाही पाठवला आहे. विशेष म्हणजे मुरुगन यांना दोन मुलं आणि पत्नी आहे. पण माझ्यासाठी अम्मांचे स्मारक महत्त्वाचे आहे असे मुरुगन यांनी सांगितले.

मुरुगन यांनी १४ वेळा गिनीज रेकॉर्ड केले आहे. एका पायावर ८१ तास उभे राहणे, पेरियार नदीत १५७ किलोमीटर पोहणे, ८१ फुटांवरुन ४ फूट खोल टँकमध्ये उडी मारणे असे विविध विक्रम त्यांच्या नावावर आहेत. मला विक्रमापेक्षा जयललिता यांच्याहस्ते पुरस्कार स्वीकारताना जास्त आनंद व्हायचा. भविष्यात एआयएडीएमकेचे काय होईल हे माहित नाही, पण अम्मा महत्त्वाच्या आहेत असे मुरुगन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. जयललिता यांच्या स्मारकाचे विद्यमान मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मुरुगन यांचा विचार आहे.