निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांची भीती

करोना विषाणू साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर अनिश्चिततेचे सावट असून ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोन्ही पातळ्यांवर हे चित्र आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. वेळ पडली तर सरकार आर्थिक मदत योजना जाहीर करू शकते, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी रविवारी सांगितले.

सध्याची परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट आहे. करोनाची दुसरी लाट आर्थिक पातळीवरही घातक ठरली आहे, हे मान्य करून राजीव कुमार यांनी ३१ मार्च २०२२ अखेर भारताची अर्थव्यवस्था ११ टक्के वृद्धिदर गाठू शकेल, अशी आशा व्यक्त केली.

भारत करोना विषाणूचा पराभव करण्याच्या मार्गावर असताना ब्रिटनमधून करोनाचा नवा प्रकार देशात आला. त्यानंतर इतर प्रकार तयार झाले, त्यामुळे परिस्थिती आणखी कठीण बनत गेली. सेवा क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला असून दुसऱ्या लाटेमुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. आर्थिक परिस्थिती बिघडली असून या अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे. ग्राहक आणि गुंतवणूकदार या दोन्ही पातळ्यांवर ही अनिश्चितता असणार आहे, असे राजीव यांनी स्पष्ट केले.

रिझव्‍‌र्ह बँकेबाबत सांगायचे तर तिचे धोरण सातत्यपूर्ण आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने गेल्या आठवडय़ातही व्याजदर बदलला नव्हता. तो चार टक्केच कायम राखला होता. त्यात सर्वसमावेशक अशी भूमिका होती. आर्थिक विकासदराबाबत कुमार यांनी सांगितले, की विविध अंदाजानुसार तो ११ टक्के राहील. रिझव्‍‌र्ह बँकेचा गेल्या धोरणात्मक आढाव्यातील अंदाज १०.५ टक्के होता, आर्थिक सर्वेक्षणात तो ११ टक्के देण्यात आला आहे. २०२०-२१ मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा आठ टक्क्य़ांनी संकोच झाला असल्याचा अधिकृत अंदाज आहे.

सध्या देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असून मृत्यूंची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी निर्बंध लागू केले आहेत. ते टाळेबंदीसदृश आहेत.

..तर सरकारची आर्थिक योजना

सरकार पुन्हा आर्थिक योजना जाहीर करणार आहे का, या प्रश्नावर राजीव कुमार म्हणाले, की करोनाच्या दुसऱ्या लाटेचे अर्थकारणावर झालेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम अर्थ मंत्रालय तपासत आहे, त्यानंतरच याबाबत विचार करता येईल. गरज पडली तर सरकार आर्थिक योजनाही जाहीर करू शकते, असेही ते म्हणाले.