लॉकडाउनच्या विषयावरुन खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. लॉकडाउनला अजूनही लोक गांभीर्याने घेत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यावर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

“आमच्या पंतप्रधानांना लॉकडाउनला लोक अजूनही गांभीर्याने घेत नसल्याची चिंता आहे. प्रिय पंतप्रधान, भिती आणि चिंतेच्या या वातावरणात तुम्ही सणासारखी स्थिती निर्माण केली आहे, त्यामुळे असेच होणार. सरकार गंभीर असेल तर जनात गंभीर राहिल” असे संजय राऊत यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

काल रविवारी जनता कर्फ्यू होता. त्यावेळी देशभरातून जनतेने या जनता कर्फ्यूला उस्फूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संध्याकाळी पाच वाजता घराच्या बाल्कनीत, दरवाज्यात उभं राहून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवत आभार मानण्याचं आवाहन केलं होता. यावेळी काही ठिकाणी लोक मोठया प्रमाणावर एकत्र जमले व घोषणा दिल्या. काही लोक रस्त्यावर अक्षरश: नाचत होते. त्यामुळे काही प्रमाणात या जनता कर्फ्यूच्या यशाला गालबोट लागले.

सोशल मीडियावर यामुळे प्रचंड संताप व्यक्त होत असून करोनाबद्दल आपण अद्यापही जागरुक नसल्याचं यातून स्पष्ट होत असल्याचं बोललं जात आहे. ट्विटरवर तर #stupidity हा ट्रेंड होता.