जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. अनेकांना याची लागण झाली आहे. बऱ्याच जणांना प्राणदेखील गमवावा लागला आहे. चीन, इराण, इटली इत्यादी देशांमध्ये याची लागण मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पाहायला मिळते. करोनाच्या रुपाने जगभरातील डॉक्टरांच्यासमोरही वैद्यकीयदृष्या मोठे आव्हान उभे आहे. करोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी अथवा याला आळा घालण्यासाठी ठोस असं काहीच उत्तर सध्या उपलब्ध नसल्याने काळजी घेणे हाच एक पर्याय उरला आहे. यासाठी हात स्वच्छ धुणे, तोंडाला रुमाल अथवा मास्क बांधणे, हस्तांदोलन न करणे, विलगीकरण, सोशल डिस्टन्स पाळणे इत्यादी प्रकारे काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सोशल मीडियाचादेखील चांगला उपयोग होताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी, डॉक्टर, राजकीय नेते इत्यादींबरोबरच सामान्य व्यक्तीदेखील यासंबधात त्याच्याकडे असलेली माहिती सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

इटलीमधील मिलान शहरातील गॅब्रिअल नावाच्या फोटोग्राफरने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका आपार्टमेंटचा असून तेथील रहिवासी कॉमन बाल्कनीत आपल्या घरासमोर थोड्याथोड्या अंतरावर व्यायाम करताना दिसतात. हा व्डिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना व्हिडिओसोबत लिहिलेल्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो – माझ्या ऑफिसच्या बाहेरचं दृश्य. अगदी २० दिवसांपूर्वी, माझी शेजाऱ्यांशी फार कमी ओळख होती. माझ्याप्रमाणेच त्यांच्यातील अनेकजण एकमेकांना ओळखत नव्हते. आता दर दिवशी संध्याकाळी ६ वाजता आम्ही एकत्र व्यायाम करतो. करोना व्हायरसच्या रुपानं उद्भवलेल्या वादळात, अलिकडच्या काळात सगळेजण दु:खानं ग्रासले असताना, लोकांचा हा प्रयत्न अनुभवणे खरोखरच सुखावह आहे.