मध्य प्रदेशात इंदूरमधील विविध रुग्णालयात एकूण पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे दिसून आले असून एकूण रुग्णांची संख्या आता १४ झाली आहे.  या पाचपैकी एकाही रुग्णाला परदेश प्रवासाचा इतिहास नसल्याचे इंदोरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रवीम् जादिया यांनी सांगितले.

पाच नवीन रुग्णांमध्ये तीन जण हे ४८, ६५ आणि ६८ वर्षे  वयाचे आहेत.  दोन महिला पन्नास व पासष्ट वयाच्या आहेत. ६५ वर्षांंची महिला उज्जनची असून तिला एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चार जण इंदूरचे असून सर्व पाच रुग्ण हे वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. दोन जण हे मित्र असून ते जम्मूत वैष्णोदेवीला जाऊन आले आहेत. इंदोरचे जिल्हाधिकारी लोकेश जटाव यांनी  सांगितले,की करोना रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.  याआधी पाच रुग्ण जबलपूरचे असून  प्रत्येकी एक जण भोपाळ, ग्वाल्हेर व शिवपुरीचा आहे. उज्जनचे जिल्हाधिकारी शशांक मिश्रा यांनी सांगितले,की शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

इथेनॉलवर आधारित सॅनिटायझरला परवानगी

हँड सॅनिटायझरची टंचाई निर्माण झाली असल्याने दिल्ली सरकारने इथेनॉलवर आधारित सॅनिटायझर तयार करण्यास उत्पादकांना परवानगी दिली आहे. दिल्लीतील औषध व सौंदर्यसाधने उत्पादकांना तीस जूनपर्यंत ही परवानगी देण्यात आली असून दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंदर जैन यांनी सांगितले,की या सॅनिटायझरच्या उत्पादनासाठी वेगळ्या परवान्याची गरज नाही. इथेनॉलवर आधारित सॅनिटायझरच्या निर्मितीला दिलेली परवानगी ही सशर्त असून ३० जूननंतर ती आपोआप रद्द होईल.