देशातील करोना रुग्णांचा मृत्युदर पहिल्यांदाच दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला असून करोनामुक्त होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले असल्याची माहिती मंगळवारी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. करोनामुळे आतापर्यंत एकूण ४५ हजार २५७ मृत्यू झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ८७१ रुग्ण दगावले. ११ जून रोजी मृत्युदर २.८३ टक्के होता, तो जुलैच्या अखेरीस २.७० टक्क्यांपर्यंत खाली आला. आत्ता हा दर १.९९ टक्के आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये ५३ हजार ६०१ नव्या रुग्णांची नोंद झाली असून एकूण करोना रुग्णांचा आकडा २२ लाख ६८ हजार ६७५ वर पोहोचला आहे. ४ ते १० ऑगस्ट या कालावधीत अमेरिका आणि ब्राझीलपेक्षाही दैनंदिन रुग्ण जास्त नोंदवले गेले. ७ ते १० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रतिदिन ६० हजारहून अधिक रुग्णांची भर पडली. रविवारी ९ ऑगस्ट रोजी सर्वाधिक ६४ हजार ३९९ रुग्णांची वाढ झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली.

गेल्या चोवीस तासांमध्ये ४७ हजार ७४६ रुग्ण करोनामुक्त झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १५ लाख ८३ हजार ४८९ झाली आहे. करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६९.८० टक्क्यांवर गेले आहे. तर ६ लाख ३९ हजार ९२९ रग्ण उपचाराधीन आहेत. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या २८.२१ टक्के इतके आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा ९.५ लाखांनी जास्त असल्याचेही भूषण यांनी सांगितले.

देशात १० लाख लोकांमागे सरासरी १८ हजार ३२० नमुना चाचण्या केल्या जात आहेत. २४ राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. ८ ऑगस्ट रोजी सर्वाधिक १.१९ लाख चाचण्या एकादिवसात केल्या गेल्या. गेल्या चोवीस तासांमध्ये ६ लाख ९८ हजार २९० नमुना चाचण्या झाल्या असून एकूण २.५२ कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशात लस वितरणावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय तज्ज्ञ गटाची बुधवारी बैठक बोलावण्यात आली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर लसीची निवड कशी केली जाईल, देशात लसीचे उत्पादन व वितरण कसे केले जाईल, लसीकरणातील प्राधान्यक्रम कोणते असतील, न्याय पद्धतीने लसीचे वितरण आणि लसीकरण कसे केले जाऊ शकेल, अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा केली जाणार असल्याची माहितीही भूषण यांनी दिली.