हर्षवर्धन यांचे राज्यसभेत निवेदन : मृत्युदर एका टक्क्याखाली आणण्याचे लक्ष्य

पुढील वर्षांच्या सुरुवातीला करोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. ती उपलब्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत आखणी केली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली. करोनाबळींचे प्रमाण १.६४ टक्के असून, ते एका टक्क्याखाली आणण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशातील करोनास्थितीबाबत राज्यसभेत सलग दोन दिवस चर्चा झाली. त्यावर उत्तर देताना हर्षवर्धन म्हणाले की, देशांतर्गत तीन लशींवर संशोधन केले जात आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाही कशी करायची यासंदर्भात पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ गट स्थापन करण्यात आला आहे, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

टाळेबंदीमुळे किती मनुष्यहानी आणि रुग्णवाढ टळली, याचा अभ्यास तज्ज्ञांच्या संस्थांनी केला असून, त्याआधारेच आकडेवारी दिली गेल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले. टाळेबंदीमुळे १४ ते २९ लाख संभाव्य रुग्णवाढ रोखता आली, असे विधान हर्षवर्धन यांनी केले होते. काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी त्याचा शास्त्रीय आधार विचारला होता. विदेशातून काही तज्ज्ञ भारतात पाहणी करून गेले. जुलैमध्ये ३० कोटी करोना रुग्ण असतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला होता. पण, हा आकडा प्रत्यक्षात ५० लाख असून, त्यातही २० टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत, असे हर्षवर्धन यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी करोनास्थिती नीटपणे हाताळल्याचे नमूद करत हर्षवर्धन यांनी भाषणात अनेकदा पंतप्रधानांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. गेले ८ महिने पंतप्रधान मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता राज्यांना मदत केली. सर्व मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, तज्ज्ञांशी चर्चा करून सामंजस्याने निर्णय घेतले. पण, संसदेत मात्र काही पक्ष राजकारण करत आहेत, असे हर्षवर्धन म्हणाले. पंतप्रधानांनी एकटय़ाने नव्हे तर तज्ज्ञांसह सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेतले. टाळेबंदी केली जाईल हे पंतप्रधानांनी सांगितले नाही. पण, जनता संचारबंदीद्वारे त्यांनी जनतेला मानसिकदृष्टय़ा तयार केले, असे स्पष्ट करत टाळेबंदी हा ऐतिहासिक निर्णय होता, असे हर्षवर्धन म्हणाले.

उपचाराधीन रुग्ण १० लाखांवर

* देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढत असून, ती १० लाख ९ हजार ९७६ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांमध्ये ९७ हजार ८९४ नव्या रग्णांची नोंद झाली.

* त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५१ लाख १८ हजार २५३ वर पोहोचली आहे. करोनामुक्त रुग्णांची संख्या ४० लाख २५ हजार ७९ झाली असून, गेल्या २४ तासांमध्ये ८२ हजार ७१९ रुग्ण बरे झाले.

* दिवसभरात १,१३१ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण ८३ हजार १९८ रुग्ण दगावले आहेत.