करोना विषाणूचा प्रसार ही चीनमधील सर्वात मोठी आरोग्य आणीबाणी असल्याची कबुली अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी दिली. चीनमधील करोना बळींची संख्या रविवापर्यंत जवळपास २५०० वर पोहोचली. दुसरीकडे, दक्षिण कोरियात रुग्णसंख्या वाढल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून, या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इटली आणि इराणने कठोर पावले उचलली आहेत.

चीनमध्ये सुमारे ७७ हजार जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी रविवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. चीनपुढे करोनाचे मोठे संकट उभे ठाकले असून, त्याचा सामना करताना कसोटी लागणार आहे, असे जिनपिंग म्हणाले.

चीनबाहेरही करोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. दक्षिण कोरियात करोना विषाणूने रविवारी दोघांचा मृत्यू झाला असून, १२३ नवीन रुग्ण सापडले. त्यानंतर दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांनी देशात अतिदक्षतेचा इशारा दिला. चीन वगळता इतर देशांत प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात करोनाचे रुग्ण सापडले आहेत.

इटली आणि इराणने करोना रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. इटलीतील काही शहरांत नागरिकांना घरातच राहण्याची सूचना सरकारने केली असून, दुकाने आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या. इटलीत शुक्रवारी आणि शनिवारी करोनाने प्रत्येकी एक बळी घेतला होता.