देशातील करोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्याच्या घडीला देशातल्या करोना रुग्णांची संख्या १० लाख ४ हजार ५९० इतकी झाली आहे. ज्यापैकी ६ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात ३ लाख ४२ हजार रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. तर आत्तापर्यंत देशभरात करोनाची लागण होऊन २५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.देशाची चिंता वाढली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचीही चिंता वाढली आहे कारण महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही देशातल्या इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

देशभरात करोनाचा प्रकोप वाढताना दिसतो आहे आणि ही बाब निश्चितच चिंतेची आहे. Covid19india.org ने दिलेल्या माहितीनुसार देशभरात करोना रुग्णांच्या संख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. सध्याच्या घडीला देशभरात साधारणतः ३० हजार नवे रुग्ण रोज पॉझिटिव्ह आढळत आहेत. असं सगळं असलं तरीही देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थातच रिकव्हरी रेट हा ६३.२५ टक्के इतका झाला आहे. आपल्या देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

ट्विटमध्ये काय म्हटलं आहे डॉ. हर्षवर्धन यांनी? 

आपल्या देशातील करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६३.२५ टक्के इतका झाला आहे. देशातील करोना संसर्गाचे जे रुग्ण आहेत त्यातल्या बहुतांश रुग्णांमध्ये किरकोळ लक्षणं आहेत. ०.३२ टक्के रुग्ण असे आहेत ज्यांना व्हेंटिलेटरची गरज आहे. तर ऑक्सिजन द्यावा लागणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे ३ टक्क्यांपेक्षाही कमी आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ६४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८४ हजार २८१ इतकी झाली आहे.  तर २४ तासांमध्ये २६६ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर ३.९४ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान मागील २४ तासांमध्ये ५ हजार ५२७ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे.