करोना कृतिगट प्रमुखांची नागरिकांना दक्षतेची सूचना

नवी दिल्ली : जगाची वाटचाल करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे. आठवडाभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या ६४ टक्क्यांनी तर, हॉलंडमध्ये ३३ टक्क्यांनी वाढली. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्याने रुग्णवाढ झालेली आहे. त्यामुळे भारतानेही सावध राहिले पाहिजे, असे मत करोना कृतिगटाचे प्रमुख व निती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केले.

भारतात लसीकरणाचा वेग वाढत असला तरी ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याने देश अजून सामूहिक प्रतिकारशक्तीपासून खूप दूर आहे. शिवाय, देशातील मोठ्या लोकसंख्येला करोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यातून सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा मार्ग चुकीचा ठरेल. दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असली तरी नियंत्रणातील स्थिती आटोक्याबाहेर जाऊ  नये यासाठी लोकांनी दक्ष राहणे व करोनासंदर्भातील नियमांचे पालन करणे हाच पर्याय असल्याचे पॉल म्हणाले.

भारताच्या शेजारी असणाऱ्या बांगलादेशमध्ये प्रतिदिन रुग्णवाढ ११ हजारांहून अधिक, म्यानमारमध्ये साडेचार हजारहून जास्त, इंडोनेशियात दैनंदिन रुग्णवाढ ४४ हजाराहून अधिक तर, मलेशियामध्ये १० हजारांहून जास्त होत आहे. या देशांमध्ये यापूर्वी शिखर काळात झालेल्या रुग्णवाढीपेक्षा ही वाढ तिपटीने जास्त असल्याची माहिती शुक्रवारी केंद्रीय आरोग्य संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी  दिली. जागतिक आरोग्य संघटनेनेही संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. पण, नवी लाट कधी येईल यापेक्षा तिची तीव्रता काय असेल हे पाहणे अधिक महत्त्वाचे ठरेल. भारतात दुसरी लाट अजून संपलेली नाही. काही राज्यांमध्ये दैनंदिन रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. देशातील ४७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे, असेही अगरवाल म्हणाले.

 

लसीकरणामुळे करोना रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका कमी होत असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने (आयसीएमआर) तमिळनाडूमध्ये केलेल्या पाहणीत आढळले आहे. ‘आयसीएमआर’ने १ लाख १७ हजार ५२४ पोलिसांचे सर्वेक्षण केले असून त्यातील १७ हजार ५९ पोलिसांनी एकही लसमात्रा घेतलेली नव्हती, त्यातील २० पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला. पहिली लसमात्रा घेतलेल्या ३२ हजार ७९२ पोलिसांपैकी ७  करोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला तर, दोन्ही मात्रा घेतलेल्या ६७ हजार ६७३ पोलिसांपैकी फक्त चौघांचा मृत्यू झाला. दोन्ही लसमात्रा घेतलेल्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला तरी मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांनी कमी होतो, असा निष्कर्ष या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. दोन्ही लसमात्रा घेतल्यानंतरही करोनाचा संसर्ग होऊ  शकतो पण, त्याची तीव्रता कमी असते, असे पॉल म्हणाले.

सध्याची रुग्णवाढ शिखर काळाच्या तुलनेत १० टक्के

आत्ता देशात दैनंदिन ४० हजार रुग्णवाढ होत आहे. दुसऱ्या लाटेतील शिखर काळातील रुग्णवाढीच्या तुलनेत ही वाढ १० टक्के इतकी आहे. शिवाय, करोनामुक्त होण्याचे प्रमाणही ९७ टक्के आहे. पण, लोकांचे दळणवळणाचे प्रमाण पूर्वीप्रमाणे नियमित होऊ लागले आहे. शिवाय, लोक मुखपट्टी वापरण्यातही हयगय करू लागले आहेत. त्यामुळे करोनाता प्रादुर्भाव वाढू शकतो. मुखपट्टीची लोकांनी सवय करून घेतली पाहिजे, अशी सूचना अगरवाल यांनी केली.