चीनच्या आपात्कालीन परिस्थितीत करोना लशीकरण मोहिमेला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पाठिंबा दिला आहे. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. जुलै महिन्यापासूनच चीन विविध गटांना ट्रायल स्वरुपात करोनाची लस देत आहे. दरम्यान, अनेक तज्ज्ञांची यावर टीकाही केली आहे.

चीनने जुलै महिन्यांतच करोना लशीचा आपात्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनचे अधिकारी झेंग झोंगवेई यांच्या माहितीनुसार, जूनमध्येच चीनने जागतिक आरोग्य संघटनेला आपली लशीची माहिती दिली होती. चीनने आपात्कालिन मंजुरीद्वारे अत्यावश्यक सेवांशी संबंधित लाखो कर्मचाऱ्यांना आणि हायरिस्क ग्रुपच्या अनेक जणांना करोनाची लस देण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, आजवर चिनी लशीच्या फेज-३ ट्रायलचा चाचणी अहवाल आलेला नाही. या अहवालात ही लस सुरक्षित किंवा प्रभावी आहे की नाही हे सिद्ध होईल.

आणखी वाचा- लस येण्याआधी करोनामुळे जगभरात २० लाख मृत्यू होऊ शकतात, WHO ने व्यक्त केली भीती

WHOचे सहाय्यक संचालक डॉ. मरिअनजेला सिमाओ यांनी म्हटल की, “विविध देशांना आपल्या मेडिकल प्रॉडक्टच्या आपात्कालीन उपयोगासाठी परवानगी देण्याचा अधिकार आहे. तर WHO च्या मुख्य वैज्ञानिक सोम्य स्वामिनाथन यांनी याच महिन्यात म्हटलं होतं की, “करोनाच्या लशीला आपात्कालिन मंजुरी हा तात्पुरता उपाय आहे. मोठ्या कालावधीसाठी लशीच्या वापरासाठी फेज-३ ट्रायल पूर्ण करण्याची गरज आहे.”

चीनने आपल्या तीन लशींच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. यामध्ये सीएनबीजी, सिनोवैक या लशींचा समावेश आहे. तसेच कैनसिनो कंपनीच्या लशीला लष्करात वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाचे अधिकारी झेंग झोंगवेई यांचं म्हणण आहे की, “२०२० च्या शेवटापर्यंत चीनच्या जवळ एका वर्षात ६१ कोटी लशींच्या डोसची उत्पादन क्षमता असेल. तर २०२१ च्या शेवटी ही क्षमता एक अब्ज डोस इतकी असेल”