करोना व्हायरसमुळे इटली आणि स्पेन हे युरोपातील दोन देश अत्यंत भयंकर परिस्थितीचा सामना करत आहेत. तिथे दररोज मृतांची संख्या वाढत आहे. खरंतर या देशातील आरोग्य सेवांची उत्तम आरोग्य सेवांमध्ये गणना होते. पण करोना व्हायरसच्या आक्रमणापुढे हे देश हतबल झाले आहेत. करोना व्हायरसमुळे इटली आणि स्पेनमधली आरोग्य सेवा पुरती कोलमडून गेली आहे.

माद्रिदच्या एका मोठया हॉस्पिटलमधल्या इमर्जन्सी रुममध्ये डॅनिअल बर्नाब्यू यांनी एका डेथ सर्टिफिकेटवर स्वाक्षरी केली आणि लगेच श्वासकोंडलेल्या दुसऱ्या एका रुग्णाच्या मदतीसाठी धावून गेले. स्पेनमध्ये सध्या अशी भयावह परिस्थिती आहे. रुग्णालयात दाखल होण्याआधी वेटिंग रुममध्येच रुग्ण प्राण सोडत आहेत.

शवागारात मृतदेह ठेवण्यासाठी जागा उरलेली नाही. स्पेनच्या राजधानीत अंत्यविधी थांबवण्यात आले आहेत. मृतदेह बर्फाच्या खोलीत ठेवण्यात येत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. स्पेनमधील रुग्णालयात अतिदक्षता विभागात रुग्णांची नुसती रांग लागली आहे. करोना व्हायरस हा विषाणू चीनमधून आला. पण आता चीनपेक्षा स्पेनमध्ये मृतांची संख्या जास्त आहे. बुधवारी स्पेनमध्ये ७३८ जणांचा मृत्यू झाला. करोना व्हायरसमुळे स्पेनमध्ये आतापर्यंत ४,०८९ जणांचा मृत्यू झाला आहे.