माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांनी रुग्णालयात गेले असता करोना चाचणी केली. यावेळी त्यांना करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांना विलगीकरणात राहण्याचं तसंच करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे.

प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “आपण एका दुसऱ्या कारणासाठी रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला करोनाची लागण झाली असल्याचं आढळलं. गेल्या आठवड्याभरात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांनी कृपया स्वत:ला विलगीकरणात ठेवावं तसंच आपली कोविड चाचणी करावी अशी विनंती आहे”.

दरम्यान देशात आतापर्यंत २२ लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ६२ हजार ६४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर १००७ जणांचा मृत्यू झाला आहे.