करोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णाची प्रकृती कितपत गंभीर आहे, त्यानुसार लोपिनावीर/रिटोनावीर या HIV प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. सरसकट या औषधांचा वापर करण्याऐवजी प्रत्येक रुग्णाच्या स्थितीनुसार HIV प्रतिबंधक औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

राजस्थानात इटलीहून आलेल्या एका जोडप्यावर HIV प्रतिबंधक औषधांचा वापर करण्यात आला होता. या जोडप्याचे करोना व्हायरसच्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. म्हणजे हे जोडपे करोना व्हायरस मुक्त झाले आहे. वयाची पासष्टी ओलांडलेले हे जोडपे राजस्थानमध्ये पर्यटनासाठी आले होते.

COVID – 19 च्या वैद्यकीय व्यवस्थापनासंदर्भात सुधारित मार्गदर्शकतत्वे मंगळवारी जारी करण्यात आली. त्यानुसार वयाची साठी ओलांडलेल्या डायबिटीस, मूत्रपिंडाचा विकार आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांसाठी HIV प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

एम्सचे डॉक्टर, एनसीडीसी आणि WHO या तज्ञांच्या समितीने उपचारांच्या मार्गदर्शकतत्वांचा फेरआढावा घेतला व करोना बाधितांना सहाय्यक ठरतील अशी नवीन उपचार पद्धती अंमलात आणण्याचा सल्ला दिला अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याआधी राजस्थानात उपचार घेणाऱ्या इटालियन जोडप्याची  रीतसर परवानगी घेण्यात आली होती. “करोना व्हायरसच्या रुग्णांवर एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर करण्याआधी आयसीएमआरने परवानगी घेतली आहे. इमर्जन्सीमध्ये लोपिनावीर/रिटोनावीर औषधांचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.” अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली होती.

चीनमध्ये या औषधाचा वापर करण्यात आला आहे. हे नवीन औषध नाहीय. या औषधाचे काही साईड इफेक्टस आहेत” असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले.