करोना आणि लॉकडाउनमुळे देशातील सगळे व्यवहार जवळपास ठप्प झाले आहेत. संचारबंदीच असल्यानं अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तुंची विक्री वगळता इतर सर्व बंद आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच जण आवाहन करत आहेत. मात्र, या लॉकडाउनच्या काळातही वेगवेगळ्या घटना समोर येत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. घरातून कंट्रोल रूमला फोन करून पोलिसांना चार समोसा भिजवा दो म्हणणाऱ्याला मस्करी चांगलीच अंगलट आली.

लॉकडाउन असल्यानं सगळीकडेच पोलीस यंत्रणेवर ताण आलेला आहे. मात्र, अशातही पोलिसांना त्रास देणाऱ्यांचा अपवाद राहिलेला नाही. त्यामुळे अनेकांना पोलिसांच्या लाठ्यांचा मार झेलावा लागत आहे. मात्र, एकानं चक्क पोलीस कंट्रोल रूमशी पंगा घेतला. उत्तर प्रदेशातील रामपुर जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात एकानं कंट्रोल रूमला फोन करून चार समोसा भिजवा दो, असा पोलिसांनाच आदेश सोडला. या व्यक्तीकडून वारंवार फोन केले जात असल्यानं पोलिसांनी थेट त्यांचा शोध घेतला. रात्रीच त्याला पोलिसांनी शोधलं. त्यानंतर त्रास देणाऱ्या व्यक्तीला नाला साफ करण्याचं काम दिलं. इतकंच नाही तर त्याच्याकडून नाला साफ करून घेतला. रामपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली.

संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे

गर्दीमुळे करोनाचा प्रसार वेगानं होत असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाउन लागू केला. मात्र, तरीही संचारबंदीचा भंग करणाऱ्या घटना वारंवार समोर येत आहे. संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरूद्ध थेट कारवाईचा पवित्रा सरकारनं घेतला असून, गुन्हे दाखल केले जात आहे. दरम्यान, लॉकडाउननंतर दिल्लीत असलेल्या उत्तर प्रदेश, बिहारमधील कामगारांनी परतीचे मार्ग धरले आहेत. गेल्या दोन दिवसांत यामुळे दिल्लीतील रस्त्यांवर प्रचंड गर्दी वाढली. त्यामुळे केंद्र सरकारनं तातडीनं राज्यांच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं राज्याच्या सीमा बंद केल्या.