देशात करोनाचा संसर्ग झपाट्यानं पसरत असल्याच्या पार्श्वभूमी सर्वच राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले. कर्नाटक सरकार आणि मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनीही हा संकटाचा काळ असून कुणीही घराबाहेर पडू नये. गर्दीचे कार्यक्रम टाळा असं आवाहन केलं होतं. पण, भाजपा आमदारानेच या आवाहनाला ठेंगा दाखवला. विशेष म्हणजे तीन हजार पाहुण्यांमध्ये मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचीही विशेष उपस्थिती होती. करोनाचं संकट टळेपर्यंत लग्न सोहळे आयोजित करून नका, असं आवाहन करणाऱ्या येडियुरप्पा यांच्यावर त्यामुळे आता टीका होऊ लागली आहे.

देशावर करोनाचं संकट घोंगावत असल्यानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यातील जनतेला सर्व लग्न सोहळे पुढे ढकलण्याचं आवाहन केलं होतं. हे संकट टळेपर्यंत विवाह टाळावे, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, येडियुरप्पा यावरून चर्चेत आले आहेत. करोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर असताना कर्नाटकातील भाजपाचे आमदार महंतेश कवतागिमठ यांनी आपल्या मुलीचं थाटात लग्न केलं. बेळगावमध्ये रविवारी हा लग्नसोहळा पार पडला. ‘द हिंदू’ दैनिकानं यासंदर्भात वृत्त दिलं आहे. बेळगावमधील उदयबाग औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या शगुन गार्डन लॉन्सवर हा सोहळा पार पडला. या सोहळ्या तब्बल तीन हजार लोक उपस्थित होते, असं तेथे ड्यूटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनं सांगितलं. विशेष म्हणजे खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पाचं या लग्न सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यामुळे खानापूर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेकडो गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे विवाहस्थळी करोनाविषयी जनजागृती करणारे दोन होर्डिग्ज लावण्यात आल्या होत्या. दरम्यान, करोनामुळे चिंताजनक परिस्थिती ओढवण्याची शक्यता असताना हा सोहळा कसा करण्यात आला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावरही टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती

या विवाह सोहळ्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी, श्रीमंत पाटील, आमदार महेश कुमठल्ली यांच्यासह भाजपा, काँग्रेस आणि जेडीयूचे नेते उपस्थित होते. त्यामुळे करोनामुळे उद्भवणाऱ्या संकटाची गांभीर्य राजकीय नेत्यांना नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.