टिकटॉक फेम सोनू नायकला पोलिसांनी अटक केली आहे. सोनू नायकने लॉकडाउन असतानाही इसानपूर ब्रिजवर व्हिडीओ शूट करुन टिकटॉवर अपलोड केला होता. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी २१ वर्षीय सोनू नायकला अटक केली. नंतर तिची जामीनावर सुटका करण्यात आली.

सोनू नायकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हायरल व्हिडीओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर तक्रार दाखल करत लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली. सोनू नायक खासगी रुग्णालयात परिचारिका असून टिकटॉकवर नेहमी व्हिडीओ अपलोड करत असते. टिकटॉकवर ती चांगलीच प्रसिद्ध आहे. सोमवारी रात्री सोनू नायक घराबाहेर पडली होती आणि व्हिडीओ शूट करत टिकटॉकवर अपलोड केला होता.

“रात्री नऊ वाजता ती इसानपूर ब्रिजवर पोहोचली आणि व्हिडीओ शूट केला. व्हिडीओत ती बोलत होती की, हा इसानपूर ब्रिज आहे. मोदीजी कृपया लॉकडाउन उठवा. लॉकडाउन उठल्यानंतर कृपया आम्हाला या ब्रिजवर झोपून दाखवा. तिने अजून एक व्हिडीओ शूट करुन टिकटॉकवर टाकला होता,” अशी माहिती इसानपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे एम सोलंकी यांनी दिली आहे. व्हिडीओ पाहिला असता लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याने सोनू नायकला अटक करण्यात आली होती अशी माहितीही त्यांनी दिली आहे. पण नंतर तिची जामीनावर सुटका कऱण्यात आली.

भारतात टिकटॉक सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. दोन दिवसांपूर्वीच अॅसिड हल्ल्याचं समर्थन करणारा व्हिडीओ अपलोड करणाऱ्या टिकटॉक स्टार फैजल सिद्दीकीचं अकाऊंट रद्द करण्यात आलं आहे. तसंच व्हिडीओही हटवण्यात आला आहे. याशिवाय बलात्काराचं समर्थन करणाराही एक व्हिडीओ समोर आला होता. यामुळे भारतात टिकटॉक बॅन करण्याची मागणी होत असून ऑनलाइन मोहिमच चालवली जात आहे. गुगल प्ले स्टोअरवर टिकटॉकचं रेटिंग ४.७ वरुन १.३ वर आलं आहे.