करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतामध्ये लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. २५ मार्चपासून सुरु झालेला २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिल रोजी संपणार आहे. मात्र असं असतानाच केरळातील कोझीकोडे येथे एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील एक प्रेमी युगुल लॉकडाउनच्या काळातच लग्न करण्यासाठी घरातून पळून गेलं. मात्र त्यानंतर त्यांच्यावर पळून जाण्याऐवजी लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार २१ वर्षीय मुलगी आणि २३ वर्षाचा मुलगा लॉकडाउनच्या कालावधीत घरातून पळून गेले. मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या धर्माचे असल्याने मुलीच्या घरुन लग्नाला विरोध होता. मुलगी घरातून पळून गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु करण्याआधीच हे दोघे पोलीस स्थानकात हजर झाले.

पोलिसांनी या दोघांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. यावेळी मुलीने मी २१ वर्षांची असून माझ्या इच्छेनेच मुलाबरोबर पळून गेल्याची कबुली दिली. त्यानंतर न्यायलयाने या दोघांना पळून जाण्याच्या गुन्ह्यामधून मुक्त केलं. मात्र लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. देशामध्ये २५ मार्चपासून लॉकडाउन असून अत्यावश्यक काम असेल तरच बाहेर पडावे असं आवाहन सरकारी यंत्रणांमार्फत वारंवार केलं जात आहे. नियमांचे उल्लंघन करुन कारण नसताना घराबाहेर फिरणाऱ्या अनेकांना देशभरातील वेगवगेळ्या भागांमध्ये दंड ठोठावण्यात आला आहे. असं असलं तरी कोझीकोडेमधील हे प्रकरण अगदीच वेगळं आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार या दोघांविरोधात भादंवि कलम १८८ (सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेश मोडणे) आणि कलम २६९ (निष्काळजीपणाच्या कृतीमुळे जीवघेण्या रोगाचा संसर्ग करणारे कृत्य करणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमानुसार या दोघांना सहा महिन्याचा तुरुंगवास किंवा तुरुंगवास आणि दंड किंवा नुसता दंड अशी शिक्षा होऊ शकते.