मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यामधील एका व्यक्तीला शनिवारी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीने चक्क सॅनिटायझरपासून अल्कोहोल बनवल्याचा आरोप आहे. सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते हे ठाऊक असल्याने या व्यक्तीने दारुची तल्लफ भागवण्यासाठी हा उद्योग केल्याचे समजते. या व्यक्तीने दारु बनवण्यासाठी हे उद्योग केले मात्र या व्यक्तीने अल्कोहोल वेगळं केल्यानंतर त्यापासून दारु बनवण्याचा त्याचा मनसुबा पूर्ण होण्याआधीच पोलिसांनी धाड टाकून त्याला ताब्यात घेतलं.

पीटीआयच्या वृत्तानुसार इंदल सिंग राजपूत असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. इंदल हा बोरिया जागीर गावामध्ये राहतो. इंदलच्या कृत्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर सुल्तानपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशमध्ये लॉकडाउनमुळे २५ मार्चपासून दारुची दुकाने बंद आहेत.

राज्यामधील अनेक कंपन्यांना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. करोनाचा पार्श्वभूमीवर देशामध्ये सॅनिटायझरची मागणी वाढल्याने मागणी इतका पुरवठा व्हावा आणि करोनापासून बचावासाठी सॅनिटायझर अंत्यंत महत्वाचे असल्याने अनेक कंपन्यांना सॅनिटायझर बनवण्याची परवानगी देण्याचा निर्णय अनेक राज्यांमध्ये घेण्यात आला आहे.

इंदलने ७२ टक्के अल्कोहोल असणाऱ्या सॅनिटायझरच्या मदतीने दारु बनवण्याच्या उद्देशाने अल्कोहोल वेगळं केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे अगदीच वेगळे प्रकरण असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोनिका शुक्ला यांनी दिली. इंदलविरोधात अबकारी करासंदर्भातील कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.