X
X

नेतान्याहू यांनी मानले मोदींचे आभार; म्हणाले ‘माझे प्रिय मित्र आणि…”

अमेरिका, ब्राझीलनंतर आता इस्रायलच्या पंतप्रधानांनी मानले मोदींचे आभार

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. भारताने इस्रायलला पाच टन औषधांची निर्यात केली आहे. यामध्ये मलेरियाविरोधात वापरल्या जाणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचाही समावेश आहे. या गोळ्या करोनावरील उपचारासाठी फायद्याचे असल्याचे बोलले जात आहे. भारताने एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधे पाठवल्यानेच नेतान्याहू यांनी मोदींचे आभार मानले आहेत.

नेतान्याहू यांनी गुरुवारी एक ट्विट करुन मोदींचे आभार मानले. यामध्ये त्यांनी मोदींचा उल्लेख प्रिय मित्र असा केला आहे. “क्लोरोक्विन इस्रायलमध्ये पाठवल्याबद्दल मी माझे प्रिय मित्र आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. इस्रायलच्या सर्व नागरिकांतर्फे धन्यवाद,” असं नेतान्याहू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी औषधे बनवण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य आणि औषधे घेऊन भारताने पाठवलेले विमान मंगळवारी इस्रायलमध्ये दाखल झालं. त्यानंतर दोन दिवसांनी नेतान्याहू यांनी भारताचे आभार मानले आहेत.

भारताने पाठवलेल्या साहित्यामध्ये औषधांबरोबरच क्लोरोक्विन आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचाही समावेश आहे. जगभरामध्ये सध्यातरी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही करोनावरील उपचारासाठी उत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जगभरातून या गोळ्यांची मागणी वाढली आहे.  इस्रायलमध्ये दहा हजारहून अधिक जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर ८६ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. इस्रायलमधील १२१ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.

नेतान्याहू आणि पंतप्रधान मोदींदरम्यान ३ एप्रिल रोजी फोनवर चर्चा झाली या चर्चेमध्ये नेतान्याहू यांनी भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा पुरवठा करण्याची मागणी केली. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या बनवणारा भारत हा जगामधील पहिल्या क्रमांकाचा देश असल्याने अनेक देशांनी या गोळ्यांची मागणी भारताकडे केली आहे. मात्र देशांतर्गत पुरवठा नियमित रहावा म्हणून भारताने या गोळ्यांच्या निर्यातीवर बंदी घातली होती. ही बंदी आता उठवण्यात आली आहे. इस्रायलने केलेली मागणी लक्षात घेऊनच भारताने त्यांना औषधांचा पुरवठा केला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव जगभरामध्ये होऊ लागल्यापासून नेतान्याहू आणि मोदी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. १३ मार्च रोजी नेतान्याहू यांनी मोदींकडे इस्रायलमध्ये मास्क आणि औषधे पाठवावीत यासाठी विनंती केली होती. “मी माझे मित्र नरेंद्र मोदी यांच्याशी यासंदर्भात बोललो आहे. औषधांसाठी आपण एकाच वेळी अनेक देशांवर अवलंबून आहोत. यासंदर्भात आमची चर्चा सुरु आहे,” अशी माहिती नेतन्याहू यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली होती. त्यानंतर मोदी आणि नेतान्याहू यांची ३ एप्रिल रोजी चर्चा झाली. यामध्ये दोन्ही नेत्यांनी करोनाच्या संकटावर कशाप्रकारे मात करता येईल यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते.

करोनाची लक्षणे अढळून येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अनेक देशामध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोनावर उपचार करण्यासाठी अमेरिकेला भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचा पुरवठा करावा अशी मागणी केली होती.

मात्र तज्ज्ञांमध्येच या गोळ्यांचा करोनामधील उपचारामध्ये वापर आणि त्यांच्या परिणामाबद्दल दुमत आहे. इतर औषधे सुरु असताना क्लोरोक्विनचा वापर घातक ठरु शकतो असं काही तज्ज्ञ सांगतात. भारताने अमेरिकेलाही या गोळ्यांचा पुरवठा केला आहे. इतर देशामध्येही भारताने या गोळ्या पाठवल्या आहेत. गुरुवारीच ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं होतं. भारताने केलेली मदत आम्ही कधीच विसरणार नाही, असं ट्रम्प म्हणाले आहेत. ब्राझीलच्या अध्यक्षांनाही मोदींचे या गोळ्यांचा पुरवठा केल्याबद्दल आभार मानले आहेत.

20
X