सॅनिटायझर प्यायल्याने नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मद्य मिळत नसल्याने स्थानिकांनी सॅनिटायझर प्यायलं होतं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामधील तिघांचा गुरुवारी तर इतर सहा जणांचा शुक्रवारी मृत्यू झाला. १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याने मद्याची दुकानं सध्या बंद आहेत. आयएएनएसने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

मद्याची दुकानं बंद असल्याने संबंधित व्यक्तींना सॅनिटायझर पिण्यास सुरुवात केली होती. मृतांमधील तिघे भिकारी आहेत. गुरुवारी रात्री त्यांच्यातील दोघांनी पोटात जळजळ होत असल्याची तक्रार केली. यामधील एकाचा तिथेच मृत्यू झाला तर दुसऱ्याला रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान निधन झालं.

आणखी वाचा- करोनावर मात करुन परतलेल्या नेत्याच्या स्वागताला हजारोंची गर्दी, फटाके फोडून जल्लोष

दुसरीकडे एक २८ वर्षीय तरुण गावठी दारुत सॅनिटायझरचं मिश्रण करुन पित होता. आपल्या घरातच तो बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल केलं जात असताना त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी इतर सहा जणांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, ज्यांचा मृत्यू झाला. अजून असे काही रुग्ण आहेत का ज्यांनीदेखील सॅनिटायझर प्यायल होतं याची पोलीस माहिती घेत आहेत.

पोलीस अधिक्षकांना याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. तसंच पीडित फक्त सॅनिटायझर पित होती की त्यामध्ये अजून कोणतं केमिकल मिसळत होते याचीही माहिती पोलीस घेत आहेत.