भारतात २४ नमुन्यांची Covid-19 ची चाचणी केल्यानंतर एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. सरकार आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ही माहिती दिली. जपान, इटली, अमेरिका आणि यूके या देशांशी तुलना केल्यास त्यांनी एक करोना पॉझिटिव्ह रुग्ण शोधून काढण्यासाठी भारतापेक्षाही कमी चाचण्या केल्या आहेत.

“जपानमध्ये ११.७ चाचण्यांमागे एकाचा करोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहे. इटलीत ६.७ नमुन्यांमागे एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहे. अमेरिकेत ५.३ तर यूकेमध्ये ३.४ चाचण्या करण्यात आल्या” आयसीएमआरचे आर.आर.गंगाखेडकर यांनी ही माहिती दिली. अन्य देशांच्या तुलनेत भारतात चाचण्यांचे प्रमाण कमी नाहीय. २४ पैकी २३ जणांच्या नमुन्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत आहेत असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भारतात करोना चाचणीचे प्रमाण खूप कमी असल्याचे सांगितले. चाचणी हाच करोनावर नियंत्रण मिळवण्याचा एका मार्ग आहे असे राहुल गांधी म्हणाले. सध्या ज्यांच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसतायत तसेच श्वसनासंबंधीचे त्रास दिसून येत आहेत, त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यासाठी रॅपिड अँटीबॉडी टेस्टही सुरु आहेत. करोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण सुटू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.