News Flash

लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढणार, शिक्कामोर्तब बाकी!

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढण्याची चिन्हं आहेत

करोनाचा फटका प्रत्येकाला समान बसला आहे. करोना फैलाव करण्याआधी कोणताही वंश, धर्म, रंग, जात, पंथ, भाषा किंवा सीमा पाहत नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यामुळे करोनाशी लढा देताना आपल्याला एकता आणि बंधुता यांना प्राथमिकता दिली पाहिजे असं आवाहनही नरेंद्र मोदींनी केलं आहे. (संग्रहित फोटो)

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेत लॉकडाउनसंबंधी सर्वांचं मत जाणून घेतलं. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवला जावा अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य केली असून लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्यास संमती दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्याचा माहितीला दुजोरा दिला आहे. अरविंद केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “पंतप्रधानांनी लॉकडाउन वाढवण्याचा अगदी योग्य निर्णय घेतला आहे. आज भारताची परिस्थिती अनेक विकसित देशांच्या तुलनेत चांगली आहे. कारण आपण फार लवकर लॉकडाउनचा निर्णय घेतला. जर आपण आता तो हटवला तर नुकसान होईल. त्यामुळे लॉकडाउन वाढवण्याची गरज आहे”

पंतप्रधानांसोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन वाढवण्याची मागणी केल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. याची दखल घेत लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. मात्र, अर्थव्यवस्था आणखी कुंठित होऊ नये म्हणून मध्यममार्ग काढण्याचेही संकेत मिळत आहेत. जे कारखाने आपल्या कामगारांची राहण्याची सोय कारखान्यात करतील ते कारखाने कदाचित सुरू राहू शकतील. तसेच कृषी क्षेत्रही कार्यरत रहावे असे उपाय योजण्यात येणार असल्याचे समजते.

अरविंद केजरीवाल यांनी बैठकीत नरेंद्र मोदींकडे काही ठराविक राज्यांमध्ये लॉकडाउन न वाढवता, संपूर्ण देशभरात लॉकडाउन वाढवला गेला पाहिजे असं मत मांडलं होतं. “लॉकडाउन संपूर्ण देशात वाढवला पाहिजे. एखाद्या राज्यातून लॉकडाऊन हटवणं आणि एखाद्या राज्यात सुरु ठेवणं योग्य नाही,” असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं.

नरेंद्र मोदी यांची बुधवारी सर्व पक्षांच्या नेत्यांशी बैठक झाली होती. या बैठकीत नरेंद्र मोदींनी एकत्र लॉकडाउन उठवणं शक्य नसल्याचं स्पष्ट सांगितलं होतं. “प्रत्येकाचा जीव वाचवणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसंच करोनानंतरचं आयुष्य फार वेगळं असेल. वैयक्तीक आणि सामाजिक आयुष्यात फार मोठा बदल होईल,” असं नरेंद्र मोदींनी सांगितल्याची माहिती बैठकीत उपस्थित नेत्यांनी दिली होती.

करोनाचा फैलाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या २१ दिवसांचा लॉकडाउन १४ एप्रिलला संपत आहे. महत्त्वाचं म्हणजे ओडिशा राज्याने तर आधीच एप्रिल अखेपर्यंत लॉकडाउन जाहीर करुन टाकला आहे. तसंच पंजाब सरकारनेही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये १ मेपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन वाढवण्याचे संकेत दिले होते. पंजाबमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पंजाबमध्ये १०० पेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 4:00 pm

Web Title: coronavirus pm narendra modi may extend lockdown by two weeks sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 गरजू व्यक्तींना अन्नदान करताना सेल्फी किंवा फोटा काढल्यास तुरुंगात जाल
2 कधी खिडक्यांतून गप्पा, तर कधी नेटफ्लिक्सची मदत; वाचा करोना फायटर्सच्या गोष्टी
3 पोलिसांच्या सुरक्षेत भाजपा आमदाराचं जंगी बर्थडे सेलिब्रेशन, गर्दीला समजावलं सोशल डिस्टन्सिंगचं महत्त्व
Just Now!
X