करोनानं देशात थैमानं घातलं आहे. सगळीकडं एक भीतीचं आणि तणावाचं वातावरण आहे. संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये आहे. अनेक राज्यामध्ये लोकांनी अनावश्यक कामांसाठी घराबाहेर पडू नये पोलिसांना विशेष सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडं देशातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. अशात प्रसिद्ध शायर राहत इंदौरी हे करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

काही दिवसांपूर्वी शायर राहत इंदौरी यांचा ‘बुलाती है मगर जाने का नहीं’ हा शेर खूप चर्चेत आला होता. सोशल मीडियावर शेरनं अक्षरशः धूमाकूळचं घातला होता. सध्या राहत इंदौरी एका गोष्टीमुळं पुन्हा चर्चेत आले आहेत. देशात करोनामुळे परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. लॉकडाउन लागू करण्यात आला असला तरी करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशात शायर राहत इंदौरी यांनी त्यांच्या स्वतःच घरात करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करावे, असं पंतप्रधान मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना म्हटलं आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व शिवराज सिंह चौहानजी, परमेश्वराने देशामधील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू देऊ नये. पण, जर वाढलीच आणि इंदौरमध्ये रुग्णांना विलगीकरणासाठी जागेची गरज असेल तर माझं घर तयार आहे. ईश्वर आपल्या सगळ्यांचं या संकटापासून रक्षण करो,’ असं राहत इंदौरी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

देशातील करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत गेल्या दहा दिवसात धक्कादायक वाढ झाली आहे. बुधवारपर्यंत देशात ५६२ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर संशयितांची संख्याही मोठी आहे.