करोना विषाणूचा जगभरात फैलाव झालेला आहे. मागील काही दिवसांपासून ब्रिटनमधील नवीन करोना विषाणूमुळे (करोना स्ट्रेन) पुन्हा जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मात्र मागील वर्षभरापासून जगभरामध्ये थैमान घालणारा हा विषाणू पृथ्वीच्या सर्वात दक्षिणेला असणाऱ्या अंटार्क्टिका खंडामध्ये या विषाणूने शिरकाव केला नव्हता. मात्र सोमवारी येथेही करोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिलीमधील एका संशोधन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार अंटार्क्टिकामधील ३६ जणांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे. असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनेही या संदर्भातील वृत्तांकन केलं आहे.

नक्की वाचा >> “ताडी गंगेच्या पाण्यापेक्षा शुद्ध, ताडी प्यायल्याने करोनाचा संसर्ग होत नाही”; बसपा नेत्याचा दावा

चिलीमधील एका संशोधन केंद्राने अंटार्क्टिकातील ३६ जणांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. संसर्ग झालेल्या ३६ जणांपैकी २६ जण हे चिलीच्या लष्करामधील जवान असून १० जण हे येथे तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात आलेल्या केंद्रामधील व्यवस्थापन केंद्रातील कर्मचारी आहे. चिलीने या सर्व कर्मचाऱ्यांना परत बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. अंटार्क्टिकामध्ये अनेक देशांची संशोधन केंद्र आहेत. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वच देशांनी एकमेकांसंदर्भात सहकार्याची भूमिका घेत अंटार्क्टिकामध्ये प्रवेश करण्याबद्दलचे कठोर नियम लागू केले आहेत. करोनाचा फटका अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्रांनाही बसला असून करोनाचा येथे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अनेक पद्धतीने काळजी घेतली जात होती. मात्र आता अंटार्क्टिकामध्येही करोनाचे रुग्ण आढळून आल्याने जगातील सर्वच खंडांमध्ये करोनाचा संसर्ग परसल्याचे सिद्ध झालं आहे.

नक्की वाचा >> जाणून घ्या : कोणकोणत्या देशांमध्ये आढळून आलाय नवीन स्ट्रेन असणारा करोना विषाणू?

करोनाच्या पार्श्वभूमीवर अंटार्क्टिकामध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्बंध म्हणजे मागील अनेक महिन्यांपासून अंटार्क्टिकामध्ये पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आलीय. येथे करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र २७ नोव्हेंबर रोजी चिलीच्या संशोधन केंद्रासाठी काही सामान पाठवण्यात आलं. याच सामानामधून चिलीच्या संशोधन केंद्रातील सैनिकांना आणि कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र चिलीने हे सामान ज्या व्यक्तींच्या माध्यमातून पाठवण्यात आलं त्यांची करोना चाचणी केल्यानंतर त्यांना अंटार्क्टिकाला पाठवण्यात आल्याचं म्हटलं आहे. चिलीमध्ये सामानासोबत गेलेल्या टीममधील सर्वांचे करोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याचेही चिलीनं स्पष्ट केलं आहे. अंटार्क्टिकामध्ये हे सामान पोहचवून जहाजाने ही टीम परत आली असता या टीममधील काही जण करोना पॉझिटिव्ह आढळले.