वसाहतवादाच्या माध्यमातून जगभरातील वेगवेगळ्या भूभागांवर राज्य करणाऱ्या ब्रिटनला करोनाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतरही ब्रिटनला जेवढा आर्थिक फटका बसला नव्हता तेवढा मोठा फटका करोनामुळे बसण्याची शक्यता देशातील प्रमुख बँकेने व्यक्त केली आहे. बँक ऑफ इंग्लंडने अर्थव्यवस्थेमध्ये मोठी घसरण दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. १७०६ नंतर पहिल्यांदाच म्हणजेच ३०० वर्षानंतर पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मागील सहामाहीच्या तुलनेत यंदा ब्रिटनची अर्थव्यवस्था ३० टक्क्यांहून अधिक घसरण्याची शक्यता बँक ऑफ इंग्लंडने व्यक्त केली आहे. अर्थव्यवस्थेबरोबर देशामधील बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली असून दर दहा व्यक्तींमागे एक जण बेरोजगार होण्याची भिती असल्याचे बँकेने स्पष्ट केलं आहे. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे असं बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे. वेळीच उपाययोजना न केल्यास देशातील अर्थव्यवस्थेला फटका बसण्याबरोबरच बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढेल असं बँकेने म्हटलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर लॉकडाउनचे नियम शिथिल झाल्यावर अर्थव्यवस्थेमध्ये भरभराट दिसून येण्याची शक्यताही बँकेन व्यक्त केली आहे. लॉकडाउनंतर बाजारपेठा आणि उद्योग व्यवसायांमध्ये भरभराट झाल्यास पुढील सहा महिन्यांमध्ये अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मदत होण्याची शक्यता असल्याचे बँकेने स्पष्ट केलं आहे.

संपूर्ण वर्षभराची आकडेवारी पाहिल्यास अर्थव्यवस्थेमध्ये एकूण १४ टक्क्यांची घसरण होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे. याला दिर्घकालीन परिणाम दिसून येऊ शकतो असं सांगितलं जात असलं तरी हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी अपेक्षाही बँकेने व्यक्त केली आहे. आकडेवारीनुसार १७०६ नंतर पहिल्यांदाच ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेमध्ये एवढ्या मोठ्याप्रमाणात घसरण होणार असल्याचे दिसून येत आहे.

१७०६ ला काय झालं होतं?

स्पेनवर कोणाची सत्ता असेल यावरुन १७०६ साली युरोपमध्ये मोठं युद्ध झालं होतं. त्यावेळी युरोपमधील सर्वच मोठ्या देशांना याचा आर्थिक फटका बसला होता. करोनामुळे अमेरिका, भारत, चीन यासारख्या बड्या देशांबरोबर अनेक लहान मोठ्या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे. अनेक देशांमध्ये मागील अनेक आठवड्यांपासून लॉकडाउन असल्याने उद्योगधंदे बंद असल्याने आर्थिक मंदीचे परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. २००८-०९ साली आलेल्या आर्थिक मंदीपेक्षा सध्याच्या करोनासंकटामुळे ब्रिटनला तीन पट मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.