करोना व्हायरसमुळे सध्या देशात भितीचं वातावरण असून यादरम्यान एक दिलासा देणारी बातमी आली आहे. दिल्लीत करोना व्हायरसची लागण झालेल्या दोन रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिल्लीत आतापर्यंत करोनाची सात प्रकरणं समोर आली आहेत. यामधील एकाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने दाखल करुन घेण्यात आलेल्या दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशातील रुग्णांची संख्या रविवारी १०७ झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाने रविवारी स्पष्ट केले. यात दिल्ली व कर्नाटकात मरण पावलेल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे खासगी रुग्णालयात शनिवारी एका ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता. मात्र त्याची करोना चाचणी नकारात्मक आली आहे. तो सौदी अरेबियाला जाऊन आला होता. त्याला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा विकार होता, त्याला करोनाचा संसर्ग नव्हता असे दिसून आले. दरम्यान, दुबईला जाणाऱ्या विमानातील २० प्रवाशांना रविवारी केरळमधील कोची विमानतळावरून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. त्यातील ब्रिटनच्या एका नागरिकाची चाचणी सकारात्मक आली आहे. विमानोउड्डाणास सज्ज असताना ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता केरळमधील रुग्णांची संख्या २० झाली आहे, तर सर्वाधिक ३३ रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

इटलीत एका दिवसात ३६८ जणांचा मृत्यू
इटलीत करोनाने एका दिवसात ३६८ जणांचा बळी घेतला. जगभरात आतापर्यंत ६ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या एक लाख ५९ हजार ८४४ वर पोहोचली.