आज रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरातील लाइट्स बंद ठेवून दिवे लावणे, बॅटरी सुरू करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. पण, हे करत असताना दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर केल्यास ही चूक तुम्हाला महागात पडू शकते.

यासंदर्भात केंद्र सरकारने देशातील जनतेला सूचना दिला आहे. दिवे लावण्याआधी अल्कोहोल मिश्रित सॅनेटायझरचा वापर करू नका असे सांगण्यात आले आहे. कारण अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. दिवे लावताना त्याचे काही प्रमाण जर हातावर असेल तर ते पेटही घेऊ शकते. त्यामुळे हात भाजला जाण्याची शक्यता नाकारता येता नाही.

या संदर्भात लष्करानेही अशाच काही सूचना केल्या आहेत. दिवे लावण्याआधी सॅनेटायझर न वापरता हात स्वच्छ धुवून घ्या, असं लष्करानं म्हटलंय. पीआयबचे मुख्य महासंचालक के. एस. धातवालिया यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, “रविवारी रात्री दिवे लावताना अल्कोहोलचा समावेश असणारे हँड सॅनेटायझर वापरू नका.”

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळेस त्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं होतं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात, असं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. यावेळेस बोलताना मोदींनी भारतीयांकडे पाच एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एक गोष्ट करण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्यास सांगितलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं होतं.