महाराष्ट्रातील करोना रुग्णांची वाढती संख्या केंद्रासाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचं नीती आयोग सदस्या डॉक्टर व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे. जर देशाला करोनामुक्त ठेवायचं असेल तर व्हायरसला ग्राह्य धरलं जाऊ शकत नाही असंही ते म्हणाले आहेत. नागपूर शहरात १५ ते २१ मार्चदरम्यान लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“आम्ही येथे पत्रकार परिषदेसाठी पोहोचत असतानाच नागपूरमध्ये कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. म्हणजे आपण त्या परिस्थितीत पोहोचलो आहोत जिथे पुन्हा एकदा त्याच दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे,” असं डॉक्टर पॉल यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “आम्हाला महाराष्ट्राबद्दल खूप चिंता आहे. हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे. यामधून दोन धडे मिळतात ते म्हणजे करोना व्हायरसला ग्राह्य धरु नका आणि जर आपल्याला कोविडमुक्त राहायचं असेल तर आपल्याला निर्बंधांचं योग्य पद्धतीने पालन करावं लागेल”.

सध्याच्या घडीत महाराष्ट्रात सर्वात वाईट परिस्थिती असून गुरुवारी १३ हजार ६५९ रुग्णांची नोंद करण्यात आली. एकूण देशाच्या तुलनेत ही आकडेवारी ६० टक्के आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह करोन रुग्ण असणाऱ्या १० शहरांपैकी ८ महाराष्ट्रातील आहे. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, मुंबई, अमरावती, जळगाव, नाशिक आणि औरंगाबादचा समावेश आहे.

आयसीएमआरचे प्रमुख बलराम भार्गव यांना करोनाचं उत्परिवर्तन यासाठी कारणीभूत आहे का ? असं विचारण्यात आलं असता त्यांनी मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि बेजबाबदार वागणं या गोष्टी जबाबदार असल्याचं सांगितलं. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरज लागलं तर काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावा लागेल असा इशारा दिला आहे.