जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर हा देशहितासाठी लागू करण्यात आलेला कर आहे. जे व्यापारी दोन नंबरचा व्यवसाय करतात अर्थात जे करचोरी करतात आणि भ्रष्ट आहेत अशांनाच या कराचा त्रास होतो आहे अशी टीका भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी केली आहे. जे व्यापारी करचोरी करतात आणि आपला कर वाचवू पाहतात त्यांना जीएसटीमुळे त्रास होणे साहजिकच आहे. अशा लोकांना त्रास झालाच पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

अशा व्यापाऱ्यांनी आता करचोरी सोडावी आणि प्रामाणिकपणे व्यापार करावा असाही सल्ला विजयवर्गीय यांनी दिला. इंदौरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना हे वक्तव्य केले आहे. ‘फर्स्ट पोस्ट’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

जीएसटीमधील कराचे स्तर आणि इतर काही गोष्टी लक्षात घेता करचोरी करणारे लोक याविरोधात अकारण ओरडत आहेत. मात्र पक्षावर याचा परिणाम होऊ देऊ नका असे आवाहनही त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. देशाच्या हितासाठीच मोदी सरकारने जीएसटी लागू केला आहे. या कराच्या अंमलबजावणीनंतर काहीसा नाराजीचा सूर उमटतो आहे. मात्र आपण सगळ्यांनी वस्तू आणि सेवा कराचे महत्त्व जनतेला पटवून दिले पाहिजे, असेही विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.