भारताकडून आज जिओस्टेशनरी कम्युनिकेशन सॅटेलाईटचे (GSAT-9) प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दक्षिण आशियातील देशांना जीसॅटचा मोठा फायदा होणार आहे. देशांतर्गत संदेशवहनाचे जाळे अधिकाधिक घट्ट करण्यात जीसॅट महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. ‘दक्षिण आशिया सॅटेलाईट म्हणजे भारताची शेजारील देशांना अमूल्य भेट असेल,’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. मोदींनी ‘मन की बात’मध्ये जीसॅटचा उल्लेख केला होता.

जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. आज संध्याकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी जीसॅट-९ अवकाशात झेपावेल. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीसॅट-९ चे प्रक्षेपण करण्यात येईल. दक्षिण आशियातील भारताच्या शेजारी देशांसाठी ‘अमूल्य भेट’ असणाऱ्या जीसॅट-९ मध्ये उच्च दर्जाचे क्रायजॅनिक इंजिन असेल.

‘जीसॅट-९ ४ वाजून ५७ मिनिटांनी अवकाशात झेपावेल. यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व काही सुरळीत आहे,’ अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी दिली. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जीसॅट-९ प्रक्षेपित करण्यात येईल. ‘सतीश धवन अंतराळ केंद्रात जीएसटी-९ च्या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. जीएसटी-९ साठी २८ तासांचे काऊंटडाऊन आहे. काल दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी काऊंटडाऊनला सुरुवात झाली आहे,’ असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

दक्षिण आशियातील सात देश जीसॅट-९ उपक्रमाचा भाग आहेत. यामध्ये भारतासह श्रीलंका, भूतान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि मालदिवचा समावेश आहे. पाकिस्तानचा या उपक्रमात सहभाग नाही. आपल्याकडे स्वतंत्र अंतराळ कार्यक्रम असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

जीसॅट-९ च्या निर्मितीसाठी २३५ कोटींचा खर्च आला आहे. यामुळे संदेशवहन सेवेचे जाळे अधिक घट्ट होणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन कार्यातदेखील जीसॅट-९ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. दक्षिण आशियातील देशांमधील संपर्क व्यवस्था एका वेगळ्या उंचीवर नेण्यात जीसॅट-९ मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास इस्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे. जीसॅट-९ च्या मोहिमेचा कालावधी १२ वर्षांचा असेल.