भारतीय बनावटीच्या जीएसएलव्ही डी-५ या प्रक्षेपकाची (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) चाचणी उद्या श्रीहरीकोटा येथे केली जाणार आहे. तीन वर्षांच्या खंडानंतर हा प्रक्षेपक पुन्हा एकदा चाचणीसाठी सज्ज असून त्याची २९ तासांची उलट गणती सुरू झाली आहे. यावेळी जीसॅट १४ हा उपग्रह या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडला जाणार आहे.
१९८२ किलो वजनाचा हा उपग्रह घेऊन जीएसएलव्ही डी-५ प्रक्षेपक उद्या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून सोमवारी दुपारी साडेचार वाजता अवकाशात झेपावणार आहे. विशेष म्हणजे यात भारतीय बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरले आहे.
उड्डाण संमती मंडळाने दिलेल्या परवानगीनंतर या उड्डाणाची उलट गणती आज सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू झाली आहे. हा प्रक्षेपक १७ मिनिटे व आठ सेकंदात जीसॅट-१४ उपग्रहाला अवकाशात नेऊन सोडेल. या प्रक्षेपकाचे हे आठवे उड्डाण आहे. स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केलेला असल्याने या उड्डाणाला महत्त्व आहे. यापूर्वी जीएसएलव्ही डी ३ या प्रक्षेपकाचे उड्डाण १५ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले होते व ते फसले होते. त्यानंतर रशियन क्रायोजेनिक इंजिन वापरून केलेले उड्डाणही डिसेंबर २०१० मध्ये फसले होते.