अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील योजेमिटी नॅशनल पार्कमध्ये ८०० फूट खोल दरीत कोसळून मृत्युमुखी पडलेलं भारतीय जोडपं नशेत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात योजेमिटी नॅशनल पार्क इथल्या टाफ्ट पॉइंटवरून कोसळून विष्णू विश्वनाथ आणि त्याची पत्नी मीनाक्षी मूर्ती यांचा मृत्यू झाला होता.

नव्या वैद्यकीय अहवालानुसार अपघाताच्या पूर्वी ते दोघंही नशेत असल्याचं समोर आलं आहे. अपघातापूर्वी दोघांनी मद्यपान केलं होतं पण किती प्रमाणात मद्यपान केलं होतं हे मात्र कळू शकलं नाही अशी माहिती डॉक्टरांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना दिली. ऑक्टोबरमध्ये या दोघांचा मृत्यू झाला. अथक प्रयत्नानंतर चार दिवसांनी या दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी सेल्फीच्या नादात या दोघांचे मृत्यू झाले होते अशाही चर्चा होत्या मात्र नव्या वैद्यकीय अहवालानुसार दोघांचाही मृत्यू नशेत असल्यामुळे झाला असल्याचं समोर आलं आहे.

या दोघांनी २००६ मध्ये चेंगान्नूर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरींगचं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर ते दोघंही अमेरिकेत स्थायिक झाले. २९ वर्षांचा विष्णू सिस्टिम इंजिनिअर म्हणून न्यूयॉर्कमध्ये कामाला होता. दोघांनाही फिरण्याचा छंद होता. त्यासाठी आपल्या फिरस्तीवर ते सातत्याने ब्लॉगही लिहित होते‘ हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स’ नावानं ब्लॉगही लिहित असतं.