करोनामुळे मृत्यू झालेल्या बहिणीचा मृतदेह आणण्यासाठी गेलेल्या तरुणाला रुग्णालयात पोहोचल्यानंतर धक्काच बसला. करोनाची लागण झालेल्या बहिणाची एका महिन्यापूर्वी दिल्लीमधील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात मृत्यू झाला होता. दरम्यान मृतदेह आणण्यासाठी गेले असता तो सापडलाच नाही. दीपिका यांच्या मृतदेहाचा शोध न लागल्याने कुटुंबाने अखेर रुग्णालयाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

एप्रिल महिन्यात महिलेचा मृत्यू झाला होता, पण महिलेचा भाऊ सिद्दार्थ मृतदेह आणण्यासाठी रुग्णालयात गेला असता ७ मे रोजी हा प्रकार उघडकीस आला. रुग्णालय मृतदेह सोपवण्यात असमर्थ ठरल्यानंतर दीपिकाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनाही अद्याप याप्रकरणी तपासात कोणतं यश मिळालेलं नाही.

आणखी वाचा- Coronavirus : २४ वर्षीय जुळ्या भावांचा काही तासांच्या अंतराने मृत्यू

सिद्धार्थने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, दीपिकाची प्रकृती बिघडल्यानंतर नोएडामधील राम सिंग हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. १५ एप्रिलला तिला करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर रुग्णालयाने त्यांना करोनासाठी समर्पित रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं होतं.

कित्येक तास प्रयत्न केल्यानंतर अखेर सिद्धार्थ दीपिकाला लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करु शकला. उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयाने दोन ते दिवसांनी मृतदेह नेण्यासाठी सिद्धार्थला बोलावलं होतं. सिद्धार्थ आणि त्याच्या कुटुंबाला करोनाची लागण झाल्यानंतर ते विलगीकरणात होते.

आणखी वाचा- चिंताजनक! करोनामुळे एका दिवसात ५० डॉक्टरांचा मृत्यू

मृतदेह नेण्यासाठी सिद्धार्थ रुग्णालयात पोहोचला तेव्हा प्रशासन शवगृहात मृतदेह शोधत होतं, पण सापडला नाही. मृतदेह सापडल्यानंतर कळवू असं सांगत सिद्धार्थला घऱी पाठवण्यात आलं. यानंतर अखेर सिद्धार्थने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. महिनाभरातनंतरही दीपिकाचा मृतदेह सापडलेला नाही.