लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते, माजी खासदार आणि बिहारचा बाहुबली म्हणून ओळखले जाणारे मोहम्मद शाहबुद्दीन यांचं आज करोनामुळे निधन झालं. दुहेरी हत्याकांडात शिक्षा भोगत असलेल्या शाहबुद्दीन यांना करोनाच्या संसर्गानंतर तिहार तुरूंगातून आधी दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं असून, तिहार तुरूंगाचे कारागृह महानिरीक्षकांना ही माहिती दिली आहे.

राजदचे माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन तिहार तुरुंगात एका दुहेरी हत्येप्रकरणात शिक्षा भोगत होते. बुधवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना दिल्लीतील दीन दयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाचं संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर शहाबुद्दीनची प्रकृती ठिक असल्याचं तिहार तुरुंग प्रशासनाने म्हटलं होतं.

शनिवारी सकाळीच त्यांच्या निधनाच्या वृत्तावरून गोंधळ उडाला होता. काही माध्यमांनी त्यांचं निधन झाल्याचं, तर काही अफवा असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता तिहार तुरूंगाचे महानिरीक्षक संदीप गोयल यांनी शाहबुद्दीन यांच्या निधनाच्या वृत्ताला दूजोरा दिला आहे. शाहबुद्दीन यांचं करोनामुळे दिल्लीतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे.

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी शाहबुद्दीन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “माजी खासदार मोहम्मद शाहबुद्दीन यांचं करोनाच्या संसर्गाने अवेळी निधन झाल्याचं वृत्त वेदनादायी आहे. ईश्वराने त्यांना स्वर्गात जागा द्यावी आणि त्यांच्या कुटुंबाला आणि समर्थकांना दुःख सोसण्याची शक्ती द्यावी. त्यांच्या जाण्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. दुःखाच्या प्रसंगी राजद त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे,” असं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

२००४ मध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडात शहाबुद्दीन यांना न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा ठोठावली होती. वसूलीचा पैसा न दिल्याने दोन भावांची हत्या करण्यात आल्याची ही घटना होती. मोहम्मद शाहबुद्दीन यांचा बिहारमध्ये दबदबा होता. ते दोन वेळा आमदार आणि चार वेळा खासदार राहिलेले होते.