उत्तर प्रदेशातील पीलीभीत येथील सरकारी आयुर्वेदीक औषधनिर्माण केंद्राने गोमूत्रावर प्रक्रिया करुन ते आरोग्यसाठी गुणकारी पेय म्हणून त्याची विक्री करण्याची योजना आखली आहे. उत्तर प्रदेशात अशी दोन सरकारी आयुर्वेदीक औषध निर्माण केंद्रे आहेत त्यातील एक पीलीभीतमध्ये आहे. सध्या पीलीभीत येथील केंद्रात बनवली जाणारी आयुर्वेदीक औषधे पश्चिम उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यातील सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये पाठवली जातात.

आम्हाला गोमूत्राचा फक्त वैद्यकीय उपचारांसाठीच नाही, तर आरोग्यासाठी गुणकारी पेय म्हणूनही प्रसार करायचा आहे असे डॉ. प्रकाश चंद्र सक्सेना यांनी सांगितले. ते पीलीभीत सरकारी आयुर्वेदीक कॉलेज-हॉस्पिटलचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक आहेत. आम्ही गोमूत्राचा आरोग्यासाठी गुणकारी पेय म्हणून वापर करण्याची योजना आखली असून या प्रस्तावाला मंजुरी मिळवण्यासाठी लवकरच लखनऊमधील आयुर्वेद खात्याशी चर्चा करणार आहोत असे सक्सेना यांनी सांगितले.

रोज १० एमएल ते २० एमएल गोमूत्र प्यालात तर ताप, सर्दी आणि पोट दुखीच्या आजाराची बाधा होणार नाही असा दावा डॉ. प्रकाश चंद्र यांनी केला. रोज गोमूत्र प्याल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्तिही वाढेल असे ते म्हणाले. सर्वसामान्यांसाठी गोमूत्र सहज उपलब्ध करुन देण्याचे आमचे उद्दिष्टय आहे असे त्यांनी सांगितले. गोमूत्र जमा करुन त्यावर प्रक्रिया करुन ते पेय म्हणून वापरात आणण्याची योजना आहे. तुम्ही गोमूत्र कसे मिळवणार? या प्रश्नावर सक्सेना म्हणाले कि, सरकार किंवा स्वयंसेवी संस्थांकडून ज्या गोशाळा चालवल्या जातात त्यांच्या मार्फत गोमूत्र उपलब्ध होऊ शकते. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही लवकरच आयुर्वेद खात्याचे संचालक आणि तज्ञांबरोबर चर्चा करणार आहोत असे त्यांनी सांगितले.