जेएनयूमधील हिंसाचारावरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मौनचं सर्वकाही बोलून जातं असं येचुरी म्हणाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर गुंडांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईतही गेटवे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. ‘जेएनयू’, ‘एएमयू’, जामिया विद्यापीठावर झालेल्या हल्ल्याला केंद्रिय गृहमंत्री अमित शहा जबाबदार असून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत अमित शहा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार करीत विद्यार्थ्यांनी ‘ऑक्युपाय गेटवे ऑफ इंडिया’ ही चळवळ सुरू केली होती.

या प्रकरणावरून येचुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदींचं मौनचं सर्वकाही सांगून जातं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापासून काही किलोमीटर अंतरावर विद्यार्थ्यांना मारहाण होत असतानाही ते यावर काही बोलत नाहीत, याचा अर्थ एकतर ते दंगलखोरांसोबत आहेत किंवा ते अकार्यक्षम आहेत,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

कुलगुरूंना हटवा, माकपचीही मागणी
जेएनयूचे कुलगुरू एम. जगदीशकुमार यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी माकपने सोमवारी केली. विद्यापीठाच्या संकुलात विद्यार्थ्यांवर सातत्याने हल्ले होण्यास कुलगुरूच जबाबदार असल्याचा आरोपही माकपने केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच या बाबत उत्तर दिले पाहिजे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.